कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत असून, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भात व नागलीच्या रोप लागणीसाठी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात अक्षरशः झुंबड उडालेली दिसते.
गेल्या तीन-चार दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. दिवसभर उघडझाप सुरु असली तरी अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत आहे. पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा व चंदगड तालुक्यात जास्त पाऊस आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १८.१ मिलीमीटर पाऊस झाला. धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १२३ मिलीमीटर पाऊस राधानगरी धरण क्षेत्रात झाला आहे. वारणा, दूधगंगासह सर्वच धरण क्षेत्रात सरासरी ८५ मिमीच्या पुढे पाऊस झाला आहे.
'राधानगरी' धरणातून प्रति सेकंद ११०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने भोगावतीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा २० फुटांवर असून, नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हे बंधारे गेले पाण्याखाली
राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, यवलूज, तेरवाड, चिंचोळी, माणगाव
प्रमुख धरणे भरली.. पाण्याची टक्केवारी
राधानगरी ३२
तुळशी ३९
वारणा ३६
दूधगंगा १९
कासारी ३४
कडवी ५१
कुंभी ३४
पाटगाव ४४
घटप्रभा ९९
चंदगड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तालुक्यात भात रोपसह इतर शेती कामांची लगबग शिवारात पहावयास मिळत आहे. तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून जंगमहट्टी मध्यम प्रकल्प-४५ टक्के तर जांबरे प्रकल्प ७० टक्के भरला आहे.
घटप्रभा प्रकल्प भरला असून मंगळवारी दुपारी हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे घटप्रभा नदीकाठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. वाढत्या पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाली आहे. सध्या भात रोप लागवड जोरात सुरू असून हा पाऊस त्यासाठी पोषक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, कासारी या नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील बंधारा या पावसात पहिल्यांदाच मंगळवारी पाण्याखाली गेला, शिरोळ, तेरवाड आणि कृष्णा नदीवरील कनवाड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.