विकास शहा
शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या सहा दिवसात चांगली हजेरी लावली आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा एक टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे. धरणात एकूण १२.७४ टीएमसी तर ५.८६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
बुधवारी एकाच दिवसात पाणीसाठ्यात अर्धा टीएमसी वाढ झाली आहे. गतवर्षी यादिवशी एकूण पाणीसाठा १०.८८ टीएमसी होता. गतवर्षीपेक्षा पाऊसही ५८२ मिलीमीटरने जादा पडला आहे. धरण परिसर, पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा, चरण येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने कोकरूड-रेठरे बंधारा, समतानगर पूल पाण्याखाली गेला होता.
बुधवारी दुपारनंतर तो खुला झाला. धरणातून ६७५ क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी लागल्याने ६९८२ क्यूसेकने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. वारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने कोकरूड-रेठरे बंधारा, समतानार पूल पाण्याखाली गेला होता.
पाथरपुंज येथे आजअखेर १ हजार ३४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण परिसरात १ जूनपासून ७०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. दुपारी ४ पर्यंत निवळे येथे २४ मिमी, चांदोली परिसरात ३ मिमी, धनगरवाडा येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस
(कंसात एकूण पाऊस मिमी मध्ये)
चांदोली धरण : १०५ (७००)
पाथरपुंज : ९० (१३४५)
निवळे : १३७ (१९९७)
धनगरवाडा : ५६ (५६९)