नीरा : पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांसाठी वरदान असलेल्या नीरा खोऱ्यातील वीर, नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी या चार धरणांत मिळून १६.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ३ जुलैला या चार धरणांत मिळून १०.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
नीरा खोऱ्यातील या चार धरणांत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ६ टक्के जास्त पाणी असून वीर धरणामध्ये सध्या २६.६३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच नीरा-देवधर धरणात १२.४९ टक्के, भाटघर धरणात १४.४७ टक्के, गुंजवणी धरणात १९.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
नीरा खोऱ्यातील सर्वच धरणांत या वर्षी गतवर्षीपेक्षा जास्त पाणी शिल्लक आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्यास या धरणांच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
चालू वर्षी नीरा खोऱ्यातील वीर, नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी या चारही धरणांतील पाणीसाठ्याचे धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन केल्याने पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा पुरला आहे. चालू वर्षी २ जुलै रोजी वीर धरणाची पातळी ५७०.८६ मीटर, नीरा देवधरणाची पातळी ६३८.२० मीटर, भाटघर धरणाची पातळी ६०१.३९ मीटर व गुंजवणी धरणाची पातळी ७०६.२० असा पाणीसाठा आहे.
नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झाली असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२६ मिलिमीटर, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २२५ मिलिमीटर, नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २७४ मिलिमीटर, गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४२७ मिलिमीटर पाऊस बुधवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाला असल्याची माहिती नीरा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
चार धरणांची पाणीपातळी (टक्के)
धरण | २ जुलै २०२३ | २ जुलै २०२४ |
वीर | ११.४४ | २६.६३ |
भाटघर | ९.१८ | १४.४७ |
देवघर | १०.७५ | १२.४९ |
गुंजवणी | १५.०१ | १९.९९ |
अधिक वाचा: Koyna Dam कोयना धरणसाठ्यात एका दिवसात किती टीएमसीने वाढ