शेतात काम करत असताना अनेकदा शेतकरी बांधवांना शेतामध्ये सर्प आढळतात. शेती मातीचा रक्षक असलेला हा प्राणी आपल्याला इजा पोहचवेल या भीतीने शेतकरी त्या सर्पाला मारत असतात. खरंतर अनेक सर्प हे बिनविषारी असतात पण अल्प ज्ञानामुळे आणि भिती पोटी ते मारले जातात.
शेती मातीचा खरा मित्र किंबहुना शेतीला असलेले वरदान म्हणजे सर्प आहे. मात्र अंधश्रद्धा आणि गैरसमजातून दररोज हे प्राणी मारले जातात. ज्याची अनेक कारणे आहेत पण त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे ते सर्पाचे शेतीला होणारे फायदे ते कसे जाणून घेऊया.
सर्प शेतीसाठी कसे फायद्याचे
शेतात उंदरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. ज्यामुळे धान्यांची, पिकांची नासाडी होत असते अशावेळी उंदीर मुख्य अन्न असलेले सर्प शेतीला एक प्रकारे वरदान ठरतात. ज्यामुळे शेतातील उंदरांची संख्या नियंत्रणात असते. परिणामी शेती पिकांचे अधिक उत्पादन शेतकरी बांधवांना मिळविता येते.
सर्प आणि गैरसमज
सर्पांच्या बाबतीत अंधश्रध्देतून अनेक गैरसमज शेतकरी बांधवांत निर्माण झालेले आहेत. ज्यात प्रामुख्याने सर्प दूध पितात, गाईंच्या पायांना पीळ देतात, आदी गैरसमजांचा समावेश आहे. मात्र सर्प हा मांसाहारी प्राणी आहे. तसेच सर्पाची पचनक्रिया दूध पचविण्याइतपत कार्यश्रम नसल्याने सर्प दूध पित नाही. अनेकदा गारुडी सर्पाना दूध पाजतात ते कसे तर त्याचे कारण म्हणजे त्याआधी सर्पाना अनेक दिवस उपाशी ठेवले जाते ज्यामुळे भुकेपोटी ते सर्प दुधाला पाणी समजून पितात.
सर्पदंश होऊ नये यासाठी अशी घ्या काळजी
शेतात अधिक गवत असेल तर पायात चांगले बूट घालावे. तसेच अनेक दिवसांपासून साचवलेले सरपण किंवा काही शेतीतील वस्तु बाजूला करावयाच्या असतील तर तेव्हा तिथे काडीने आवाज करावा ज्यामुळे त्या आवाजाच्या कुंपणाने सर्प असेल तर ते तिथून निघून जातात.