दिलीप कुंभार
नरवाड : मिरज पूर्व भागातील शेतकरी सुधारित तंत्रातून पानमळ्याची शेती करत आहेत. या शेतकऱ्यांना एकरी ६० हजार रुपयांचा खर्च येत असला तरी उत्पन्न तीन ते चार लाख रुपयेपर्यंत येत आहे.
पानमळ्याला काळी कसदार पण निचऱ्याची जमीन आवश्यक असते. खडकाळ जमिनीत पानमळा येतो, पण अधिक कष्ट घ्यावे लागतात. पानाला पूजनात मोलाचे स्थान आहे. याशिवाय आयुर्वेदात ही पानाचे महत्त्व सांगितले आहे. यामुळे पान व्यवसाय आजही टिकून आहे.
पानमळा लागवडीसाठी वाफे पद्धत अवलंबली जाते. याकरिता कपुरी जातीच्या पानवेलीच्या बियाण्यांच्या कलमांची बियाणे म्हणून निवड केली जाते. शेंड्याकडील किमान १० ते १२ इंच लांबीचे कलम बियाणे म्हणून वापरले जाते.
एका बियाणांची (कलमाची) किंमत ८ ते १० रुपये इतकी आहे. ४० आर क्षेत्रावर पानमळा लागवड करण्यासाठी किमान ६० हजार रुपये खर्च येतो. याशिवाय कुशल कामगारांचा अतिरिक्त खर्च येतो.
एक एकर क्षेत्रावर पानमळा लागवड करण्यासाठी किमान २ लाख रुपये खर्च येतो. पानमळा लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षी पानांचे भरघोस उत्पादन मिळते. ४० आर क्षेत्रावर पानमळा केल्यास किमान ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न मिळते.
पानमळा लागवड साधारणपणे में च्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. पानवेलीची लागवड अगाप केल्यास पानवेलीचे पहिल्या वर्षी थोडे उत्पन्न मिळून जाते. पानमळ्याच्या लागवडीसाठी रिमझिम पाऊस व ढगाळ हवामानाची आवश्यकता असते.
याच हवामानात पानवेली तग धरू शकतात. यामध्ये उन्हाचा तडाखा बसल्यास तुटाळी मोठ्या प्रमाणावर होते. पानमळ्याच्या पानांचा खुडा प्रत्येक २१ दिवसांनी येतो. पानवेलीच्या अनेक जाती असून कपुरी जातीशिवाय अन्य जाती उन्हात तग धरू शकत नाहीत.
यामध्ये मगई, बनारस, मद्रासी आदी जातीची पाने उष्णतेमुळे करपू लागतात. मिरज तालुक्यातून पानमळे मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतात. याठिकाणी सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर पानवेलीची लागवड केली आहे.
तीनशे पानांची एक कवळी
पानांच्या प्रतवारीनुसार कळी, फापडा व हाक्कल (लहान पाने) असा पानांचा खुडा केला जातो, पानांची एक कवळी ३०० पानांची असते. पानांच्या एका डागात (गठ्ठयात) ४० कवळ्या म्हणजे १२ हजार पाने असतात. अलिकडे डागाची पध्दत बंद होऊन डप्प्याची पद्धत आली आहे. यामध्ये एक डप्यात तीन हजार पाने केळीच्या झाडाच्या सोपाटात विशिष्ट पद्धतीने बांधून पान बाजारात विक्रीसाठी पाठविली जातात.
पानवेलीची पाने सांगोला, पंढरपूर, रत्नागिरी, खेड, पुणे, लांजा, चिपळूण, राजकोट (सिंधुदुर्ग), मुंबई आदी ठिकाणी पान एजंटांकडून पान बाजारपेठेतील वखारींना पाठविली जातात. पानमळा लागवडीत फायदा असला तरी हवामानातील झपाट्याने होणारे बदल व कुशल कामगारांचा तुटवडा यामुळे पानमळा शेतीकडेशेतकरी वळत नाहीत. - श्रीअंश लिबिकाई, पान उत्पादक शेतकरी