सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणारा पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू लागला असून सकाळच्या सुमारास ९२ टीएमसीवर पोहोचला होता. तर सातारा जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असलातरी पूर्व भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही आतापर्यंत सरासरीच्या ६० टक्क्यांच्या आसपासच पाऊस पडला आहे. त्यातील दोन महिने हे कमी पावसाचे राहिले. फक्त जुलै महिन्यातच चांगला पाऊस झालेला त्यामुळे पश्चिम भागातील धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख पाणी प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला होता. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याने निराशा केली. या दोन महिन्यात कमीच पर्जन्यमान झाले. आतातर पावसाळा संपत आला आहे. तरीही पाऊस कमी असल्याने चिंता वाढलेली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगरला ५ आणि नवजाला ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सांगलीला दोनवेळा सोडले पाणी.
कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. आतापर्यंत दोनवेळा सांगलीसाठी कोयनेतून विसर्ग करण्यात आलेला आहे. पाच दिवसांपूर्वी सांगलीसाठी कोयनेतून सुरुवातीला १०५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मागणी वाढल्याने आणखी विसर्ग वाढवून २१०० क्यूसेक करण्यात आला. पण, गेल्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्याने मंगळवारी रात्रीपासून सांगलीचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.