Irrigation Scheme :
धाराशिव/तुळजापूर :
तांत्रिक अडचणीसह पावसामुळे रखडलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून उपसा सिंचन योजनेचे (क्र.२) काम जवळपास ९० टक्के पूर्णत्वाकडे गेले आहे.
हक्काचे ७ पैकी २.२४ टीएमसी पाणी डिसेंबर अखेर तुळजापूर येथील रामदरा तलावात येणार आहे, असा दावा सिंचन विभागाच्या यंत्रणेकडून केला आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प क्र. २ चे काम पूर्णत्वाकडे आले आहे.
एप्रिल, मे मध्ये तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले होते. त्यानंतर जून ते सप्टेंबर दरम्यान पावसामुळे कामाला गती मिळाली नाही. सध्या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे.
यामुळे कृष्णेच्या २१ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसी पाणी मिळण्याला चालना मिळाली आहे. यापैकी २.२४ टीएमसी पाणी उपसा योजना क्रमांक दोनमधून तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत.
आजपर्यंत योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा सिंचन विभागाच्या यंत्रणेकडून केला आहे. उर्वरित १० टक्के काम प्रगतिपथावर असून डिसेंबर अखेर तुळजापूर शहराला लागून असलेल्या रामदरा तलावात पाणी धडकणार आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्र. २ च्या कामामुळे सुरूवातीला तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतीचे उत्पन्न वाढणार आहे.
आमदार पाटील-धीरज पाटील यांच्या तू तू... मैं मैं
सिंदफळ पंपहाऊसवर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांच्यात तू तू मैं मैं झाली. कार्यक्रम राजकीय की प्रशासकीय यावरून वादाला सुरुवात झाली. मावेजा मिळाला नसताना व प्रकल्प पूर्ण झाला नसताना श्रेय घेण्यासाठी ही उठाठेव असल्याचा आरोप धीरज पाटील यांनी केला. यावर आ. पाटील यांनी हा कार्यक्रम भूमिपूजनाचा नसल्याचे स्पष्ट केले. यानंतरही काही वेळ येथे तणाव होता.
निधी मिळाला, कामाला वेग
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यास पुराचा धोका निर्माण झाल्यास किंवा पूर आल्यास वर्षातील ३६५ पैकी ७५ दिवस २.५ टीएमसी पाणी उचलता येणार आहे. या प्रकल्पावर सुमारे ६०९ कोटीपेक्षा अधिक निधी मंजूर आहे. काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी सध्या सिंचन विभागाला निधी मिळाला आहे, अशी माहिती सिंचनच्या यंत्रणेकडून देण्यात आली.
रामदरा तलावात पाणी आणणार
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना (क्र.२) चे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मध्यंतरी तांत्रिक अडचणी व पावसामुळे काम कासवगतीने सुरू होते.
सध्या कामाला वेग आला असून शनिवारी तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यासह सिंदफळ येथील पंप हाऊसच्या कामाला भेट देऊन आढावा घेतला.
त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार पाटील यांनी डिसेंबर अखेर कृष्णेचे पाणी रामदरा तलावात आणणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला. प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले.