सातारा : केंद्र शासनाने निर्यात शुल्क कमी केल्याने कांद्याच्या दरात क्विंटलमागे जवळपास ५०० रुपये वाढ झाली आहे. साताराबाजार समितीत तर क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर मिळू लागलाय.
पण सध्या कांदाच कमी असल्याने शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार याबाबत साशंकता आहे. उलट साठेबाजीवाल्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. विविध हंगामात कांदा पीक घेणारे शेतकरी आहेत. मागील वर्षभराचा विचार करता कांद्याला कमीच भाव मिळाला. याचे पडसाद लोकसभा निवडणुकीवेळीही उमटले होते.
त्यातच शेतकऱ्यांकडूनही कांद्याचे दर वाढण्याची मागणी होत होती. त्यामुळे मागील आठवड्यात केंद्र शासनाने निर्यात शुल्क कमी केले आहे. या कारणाने कांद्याच्या दराने उसळी घेतली. क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपये वाढले.
सातारा बाजार समितीत तर कांद्याचा भाव तेजीत आहे. सध्या कांद्याला क्विंटलला दोन हजारांपासून दर येत आहे. सातारा बाजार समितीत वांग्याला क्विंटलला चार हजारांपर्यंत दर येत आहे. टोमॅटोला अडीच हजार, फ्लॉवर पाच हजार मिळत आहे.
केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यामुळे दरात वाढ आहे. पण, याचा फायदा शेतकऱ्यांना होणारच नाही. कारण, पावसाळ्यात कांदाच निघत नाही. निवडणुका असल्यानेच निर्णय झाला आहे. याचा फायदा कांदा साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांना होईल, तर निवडणुका झाल्यावर कांदा नाही. निघण्याच्यावेळी दर कमी होईल. केंद्राच्या धोरणात शेतकऱ्यांना कोठेच स्थान - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना