सातारा : जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ४५ मिलिमीटरची नोंद झाली, तर कोयनेला ३१ आणि महाबळेश्वरला ३० मिलिमीटर पाऊस पडला.
गतवर्षीपेक्षा यंदा या ठिकाणी पाऊस अधिक झाला आहे, तर कोयना धरणात १५ टीएमसी साठा शिल्लक आहे. धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही. जिल्ह्यात मान्सूनचे वेळेत आगमन झाले. त्यामुळे मागील बुधवारपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे.
पूर्व, तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील सहा महिने दुष्काळी झळा सोसणाऱ्या माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्यातही पावसाने चिंब करून सोडले आहे. यामुळे गावोगावच्या ओढ्यांना पाणी वाहिले, तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे.
परिणामी, खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे, तर आतापर्यंत दुष्काळी तालुक्यात गतवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. सध्या जमिनीला वापसा येण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार आहे, तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पावसामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत.
अधिक वाचा: Ujani Dam उजनी ८ टक्क्यांनी वाढले, किती टीएमसी पाणी आले