सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग होत आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून परतीचा पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पाऊस चांगलीच हजेरी लावत आहे. आतापर्यंत माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात दमदार पाऊस पडला आहे. तर पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात सलग तीन दिवस धुवाधार पाऊस झाला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरीही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने विसर्ग सुरूच आहे.
शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०, तर नवाजला २७ आणि महाबळेश्वरमध्ये ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला ६ हजार ७८३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वरला ६ हजार ४६२ आणि कोयनानगर येथे ५ हजार ५२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत असल्याने आवक सुरू आहे. यामुळे या पावसाळ्यात तिसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडले.
आमच्याशी व्हॉटसअप्प द्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा.