सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असून, कोयना धरणातही आवक कमी आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर धरणात १०४.३८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला. तर जुलै महिन्याच्या मध्यावर अतिवृष्टी झाली. पश्चिम भागात १२ दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले.
तर पूर्व दुष्काळी तालुक्यातही पावसाचे चांगले प्रमाण होते. याचा फायदा खरीप हंगामातील पिकांना झाला. तसेच पावसामुळे जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी, कोयना आदींसारख्या मोठ्या प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता.
तर ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, नंतर चांगला पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण वाढले. यामुळे मोठे पाणी प्रकल्प भरले आहेत. सध्या पश्चिमेकडे पाऊस कमी झाला आहे.
शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे काहीच पाऊस झाला नाही. तर कोयनानगरला ४ आणि महाबळेश्वरमध्ये ३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.
तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला ५ हजार ३१३, नवजा येथे ६ हजार ४९२ आणि महाबळेश्वरमध्ये ६ हजार १३७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८ हजार ९३४ क्युसेक वेगाने पाणी येत होते.
कोयना धरणातून एकूण ११ हजार ३९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. आवकपेक्षा विसर्ग जादा होता. त्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे बंद करून ९ हजार २९७ क्युसेक थांबविण्यात आला. सध्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.