सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसानंतर पाऊस झाला असून, कोयनानगर येथे सर्वाधिक २१ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणात आवक कमी प्रमाणात टिकून आहे तर धरणाच्या दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे यावर्षी चिंतेचे वातावरण राहिलेले नाही. कारण, वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले आहे.
ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस जोर धरेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला. पण हा अंदाज आतापर्यंत तरी फोल ठरलेला आहे. जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागातही मोठा पाऊस झाला नाही. यापुढेही मोठ्या पावसाची शक्यता नाही.
पश्चिम भागात चार दिवसानंतर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत २१ मिलिमीटर पाऊस पडला तर महाबळेश्वरला ५ मिलिमीटरची नोंद झाली.
नवजाला पाऊस झालाच नाही तर १ जूनपासून आतापर्यंतचा विचार करता कोयनानगरला ५ हजार ६१० तर महाबळेश्वर येथे ६ हजार ५२१ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
जिल्ह्यात पाथरपुंजनंतर नवजा येथे सर्वाधिक ६ हजार ८१७ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर बुधवारी सकाळी कोयना धरणात १ हजार २५३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०४.७१ टीएमसी होता.
९९.४९ ही पाणीसाठ्याची टक्केवारी आहे तर दोन दिवसांपूर्वीच धरणाच्या पायथा वीजगृहातील दोन्ही युनिट बंद करण्यात आली. त्यामुळे २ हजार १०० क्युसेक विसर्गही थांबलेला आहे.