सातारा : जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर कोयना धरण १०० टक्के भरले. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला.
धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे एक फुटाने उचलून साडेनऊ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे.
पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतही दमदार पाऊस झाला आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही मोठी धरणे भरल्यातच जमा आहेत.
कोयना पाणलोट क्षेत्रातही मंगळवारपासून पावसाचा जोर वाढ वाढल्याने बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा होऊन ते १०० टक्के भरले. यामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून ९ हजार ५४६ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.
धरणाच्या पायथा वीजगृहातूनही २ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरूच आहे. धरणातून एकूण ११ हजार ६४६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाथरपुंज येथे सात हजार मिलिमीटर पावसाची नोंद
• चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे गेल्या चोवीस तासात १०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चांदोली येथे ५१, निवळे येथे ८७, धनगरवाडा येथे ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
• चांदोलीत साडेतीन हजार तर पाथरपुंज येथे सात हजार मिलिमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाचा एक दरवाजा ०.४० मीटरने उघडला असून २९५४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
• चांदोली धरणात एकूण ३३.४८ टीएमसी पाणीसाठा आहे.