सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असून, महाबळेश्वरला एक तर नवजा येथे दोन मिलिमीटरची नोंद झाली. कोयनेला पावसाची विश्रांती असून, धरणात आवकही कमी झाली आहे.
त्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग बंद करण्यात येऊ शकतो. तर सोमवारी सकाळी धरणात पूर्ण १००.२५ टीएमसी पाणीसाठा होता. जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून पाऊस पडत आहे.
सध्या पावसाची उघडीप असली, तरी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले आहे. यामध्ये जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेळेत सुरुवात झाली. त्यामुळे यावर्षी १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली तर जुलै महिन्यात धुवाधार पाऊस झाला.
परिणामी, प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता. ऑगस्ट महिन्यातही पावसाचे प्रमाण टिकून होते. त्यामुळे यावर्षी दुष्काळी स्थिती निर्माण होणार नाही. सप्टेंबर महिन्यातही पावसाचे प्रमाण चांगले होते.
सध्या पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाची उघडीप आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे पाऊस पडला नाही तर नवजा येथे दोन आणि महाबळेश्वरला एक मिलिमीटर पाऊस पडला.
१ जूनपासूनचा विचार करता पाथरपूंजनंतर नवजा येथे सर्वाधिक ६ हजार ७८९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. यानंतर महाबळेश्वरला ६ हजार ४७१ आणि कोयनानगर येथे ५ हजार ५३४ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे.
त्यातच दोन दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रातही पावसाची उघडीप आहे. तरीही धरणात १० हजार क्युसेक वेगाने पाणी येत आहे.
सोमवारी सकाळी धरणाच्या दरवाजातून ९ हजार ६२९ आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा एकूण ११ हजार ७२९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणात आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद होण्याची शक्यता आहे.