सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून रस्त्यावरून पाणी वाहणे, पूल पाण्याखाली जाण्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद आहे. तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने कोयना आणि कण्हेर धरणातून सुमारे ३१ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू झालाय.
दरड आणि पूरप्रवण भागातील १६७ कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. तर शुक्रवारी शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्यात पाच दिवसांपासून पावसाचा जोर आहे. उसंत न घेता पाऊस कोसळतोय. यामुळे दाणादाण उडाली आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटलाय. तसेच सुरक्षिततेच्यादृष्टीने काही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाटण, सातारा, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागात प्रशासन सतर्क झाले आहे.
नागरिकांना सुरक्षितस्थळी हटविण्यास सुरुवात झाली आहे. तर कोयनेसह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरणक्षेत्रातही दमदार पाऊस पडू लागलाय. यामुळे धरणसाठ्यात वेगाने वाढ होत चाललीय.
कोयना धरणातील पाणीसाठा ७८ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यातच धरणक्षेत्रात संततधार असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी प्रथमच धरणाचे सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.
त्यानंतर आवक पाहून सात वाजता विसर्ग २० हजार क्युसेकवर नेण्यात आला. त्यामुळे कोयनेतून पायथा वीजगृह १ हजार ५० आणि दरवाजातून २० हजार असा एकूण २१ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. हे पाणी कोयना नदीत जात असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे.
सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात ७.८८ टीएमसी पाणीसाठा झालाय. धरण ७७ टक्के भरले आहे. त्यातच धरणक्षेत्रात पाऊस असल्याने सुरुवातीला ५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू झाला. त्यानंतर ७ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला.
तर रात्री आठच्या सुमारास विसर्ग वाढवून १० हजार क्युसेक करण्यात येणार होता. यामुळे वेण्णा नदीकाठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.