कोयना धरणातून २४ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले असून ११ डिसेंबरपर्यंत दोन टीएमसी पाणीसांगली जिल्ह्याला मिळणार आहे. त्यानंतर कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोयना धरणातून पाणी बंद केल्यास टेंभू उपसा सिंचन योजना चालविण्यास खूप अडचणी निर्माण होणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कोयना धरणातून २४ नोव्हेंबरपासून एक हजार ५० क्युसेकने विसर्ग चालू होता. पाण्याला वेग कमी असल्यामुळे पुन्हा एक हजार ५० क्युसेकने विसर्ग वाढवून एकूण दोन हजार १०० क्युसेकने विसर्ग कृष्णा नदीत चालू होता. जवळपास दि. १ डिसेंबरपर्यंत दोन हजार १०० क्युसेकनेच विसर्ग होता. सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्यामुळे कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट दि. २ डिसेंबरपासून बंद केले आहे. सद्य:स्थितीत कोयना नदीमध्ये एक हजार ५० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.
या विसर्गानुसार दि. ११ डिसेंबरपर्यंत सांगली जिल्ह्याचे दोन टीएमसी पाण्याची मागणी संपणार आहे. त्यानंतर कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात येणार आहे, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे. कोयनेतून विसर्ग बंद केल्यामुळे टेंभू योजना चालविण्यात खूप अडचणी येणार आहेत. कारण, कोयना धरणाच्या पाण्यावरच टेंभू योजना चालत असून त्याचे लाभक्षेत्र सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे आहे. या क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची मागणी आहे. म्हणूनच दि. १५ डिसेंबरपासून पुन्हा टेंभू योजना चालू करण्यासाठी अधिकान्यांचे प्रयत्न चालू आहेत. कोयनेतून विसर्ग बंद केल्यास टेंभू योजना चालूच करता येणार नाही.
ताकारी योजना ११ डिसेंबरपर्यंतच चालणार
ताकारी योजनेचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. ताकारीचे पाणी सध्या १४४ किलोमीटरपर्यंत म्हणजे सोनी (ता. मिरज) येथे दि. १० डिसेंबरपर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर ताकारी योजनेचे हे आवर्तन संपणार आहे, अशी माहिती ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.