Agriculture News : नाशिकच्या (Nashik) आदिवासी पट्ट्यात नागली, वरई पिकासह खुरासणी पिकाची लागवड (Khurasani Sowing) केली जाते. मात्र अलीकडच्या काही वर्षांत या पिकांचं क्षेत्र घटत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी आवाहन करण्यात येते. त्यानुसार तालुक्यातील कुरुंगवाडी येथील शेतकऱ्याने लागवड केलेले खुरासणीचे फुले वैतरणा वाण चांगलेच फुलू लागले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत (MPKV Rahuri) विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी येथे खुरासणी या तेलवर्गीय पिकावर संशोधन केले जात आहे. या संशोधन केंद्रामार्फत कुरुंगवाडी येथे खुरासणी पिकाची पिक प्रात्याक्षिके घेतली जात आहेत. यासाठी प्रकल्प समन्वय संचालनालय, अखिल भारतीय समन्वित खुरासणी संशोधन प्रकल्प, जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ, जबलपूर यांचेकडून अनुदान प्राप्त आहे. त्या अनुषंगाने प्रकल्प संचालक डॉ. आनंद विश्वकर्मा यांनी विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांसमवेत भेट देऊन पाहणी केली.
येथील शेतकऱ्यांच्या फुले वैतरणा या वाणाच्या प्रात्यक्षिक प्लॉटला भेटी देवून त्यांच्याशी संवाद साधला. खुरासणी पिकापासून मिळणाऱ्या तेलाचे आहारातील महत्व अनन्यसाधारण आहे. या पासून मिळणारे तेल हे आरोग्यवर्धक, पौष्टिक, औषधी आणि उच्च्च प्रतीचे असल्याने ते पचनास सुलभ आहे. म्हणूनच या तेलास गरिबांचे तूप असे म्हणतात. आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या पिकाची शेतकऱ्यांनी लागवड मोठ्या प्रमाणावर करावी, असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ. विश्वकर्मा यांनी यावेळी केले.
खुरासणी फुले वैतरणा वाणाबद्दल..
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, सहयोगी संशोधन संचालक, डॉ. हेमंत पाटील, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली या पिक प्रत्याक्षिकांसाठी शेतकऱ्यांची निवड, वेळोवेळी मार्गदर्शन विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी येथील खुरासणी पैदासकार डॉ. दिपक डामसे यानी केले आहे. यावेळी कृषी सहाय्यक, विश्वनाथ गांगड (कृषी विभाग), प्रवीण लोहकरे, यांनी भेटीचे नियोजन केले. सदर भेटीनंतर विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी येथील खुरासणी पिकाच्या राज्यस्तरीय आणि अखिल भारतीय स्तरावरील विविध प्रयोगांची पाहणी त्यांनी केली.