नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने (Kadwa Sugar Factory) गळीत हंगाम 2023-24 मधील एफ.आर.पी.पोटी अंतिम ऊस बिल 64.20 रुपयाप्रमाणे रक्कम संबंधित ऊस उत्पादक यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. जवळपास एकूण 2764.20 रुपयाप्रमाणे संपुर्ण एफ.आर.पी. अदा केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली.
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Sugar Factory) कादवा सहकारी साखर कारखान्याने 2023-24 या गळीत हंगामात 329582 मे.टन ऊसाचे गाळप केले तर 12.22 टक्के साखर उतारा मिळवत 400100 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. इथेनॉल निर्मीतीला पेसो परवाना प्राप्त झाल्यामुळे एकुण 3.64 लाख इथेनॉल व 36.74 लाख लिटर स्पिरीट निर्मिती झाली आहे. या हंगामामध्ये कमी ऊस उपलब्धतेमुळे कमी गाळप झाल्याने साखर कारखान्यांना एफ.आर.पी प्रमाणे ऊस बिल अदा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. अनेक कारखाने एफ.आर.पी देवू शकले नाही, मात्र कादवाने टप्प्याटप्प्याने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम अदा केली आहे.
कादवाने आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू केली असून कार्यक्षेत्रामध्ये 3424 हेक्टर, पेठ, सुरगाणा 345 हेक्टर ऊस लागवड नोंद झालेली आहे. गेटकेन मधुन 2973 हेक्टर ऊस लागवड नोंद झाली आहे. अशी एकुण 6742 हेक्टर ऊस लागवड नोंद झालेली आहे. तसेच कार्यक्षेत्र व गेटकेनमधुन अजूनही नोंदी सुरू आहे. पुरेशा प्रमाणात ऊस तोड कामगार भरती करण्यात आली आहे. ऊस लागवड वाढण्यासाठी कारखान्याकडून विविध ऊस विकास योजना राबविल्या जात आहे. देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहे.
दरम्यान ऊस उत्पादकांना उधारीत कंपोस्ट खत तसेच रासायनिक खते उपलब्ध करून दिलेले आहे. यंदा पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन चा वापर करत ऊस लागवड करावी ठिबक सिंचन साठी कारखान्याचे धोरणानुसार कारखान्याकडून सहकार्य केले जाईल. शासनाने शेअर्सची रक्कम रु.10 हजार रुपयावरून रु.15 हजार रुपये केलेली आहे. ज्यांचे शेअर्स दहा हजार आहे, त्यांना 25 किलो तर ज्यांचे शेअर्स पूर्ण होईल, त्यांना 50 किलो साखर सवलतीच्या दरात दिली जाणार आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभा
तसेच शेअर्सची वाढीव रक्कम भरण्यास सहकार्य करावे. जास्तीत जास्त ऊस लागवड करून कादवास ऊस पुरवठा करावा. तसेच 53 व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.27 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2.00 वाजता होत आहे. सदर सभेस सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले. यावेळी व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक, प्र.कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.