- सुनील चरपे
नागपूर : बांगलादेश सरकारने (Bangaldesh) नागपुरी संत्र्यावरील आयात शुल्कामध्ये (Import Duty) पाच वर्षांत ५०५ टक्के तर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ११४.७७ टक्क्यांनी वाढ केली आहे. वाढत्या आयात शुल्कमुळे यावर्षी बांगलादेशातीलसंत्रा निर्यात आणखी मंदावणार आहेत. दुसरीकडे, देशाअंतर्गत बाजारात संत्रा विक्रीचे (Orange Crop) प्रभावी नेटवर्क नसल्याने आगामी हंगामात संत्र्याचे दर दबावात राहण्याची व संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान हाेण्याची शक्यता बळावली आहे.
विदर्भातील (Vidarbha) १ लाख ६० हजार हेक्टरमधील संत्रा बागा उत्पादनक्षम आहेत. या बागांपासून दरवर्षी किमान ७.५० ते ८ लाख टन संत्र्याचे उत्पादन हाेत असून, यात सरासरी ४.५० ते ५ लाख टन अंबिया आणि २.५० ते ३ लाख टन मृग बहाराच्या संत्र्याचा समावेश आहे. सन २०१९-२० पर्यंत यातील सरासरी २ ते २.५० लाख टन संत्र्याची निर्यात व्हायची. यातील किमान १.७५ लाख टन संत्रा बांगलादेशात निर्यात व्हायचा.
केंद्र सरकारच्या शेतमाल निर्यातबंदी धाेरणामुळे अडचणीत आलेल्या बांगलादेशने ऑक्टाेबर २०१९ मध्ये पहिल्यांदा संत्र्यावर २० टका प्रतिकिलाे आयात शुल्क लावला. यात वर्षागणिक वाढ करण्यात आल्याने सन २०२४ मध्ये हा आयात शुल्क १०१ टका प्रतिकिलाे करण्यात आला आहे. बांगलादेशातील सामान्य ग्राहकांना ६० ते ८० टका प्रतिकिलाे संत्रा खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडते. आयात शुल्कामुळे हा १६१ ते १८१ टका प्रतिकिलाे हाेणार असून, हा दर त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते इच्छा असूनही नागपुरी संत्रा खरेदी करणार नाहीत. बांगलादेशात संत्र्याची मागणी असूनही विक्री हाेणार नसल्याने निर्यात आणखी मंदावणार आहे. याचा विपरीत परिणाम संत्र्याच्या दरावर हाेणार आहे.
आयात शुल्कमधील वाढ (प्रतिकिलाे)
वर्ष - टका - रुपये
२०१९-२० :- २० - १४.२९
२०२०-२१ :- ३० - २१.४३
२०२१-२२ :- ५१ - ३६.४३
२०२२-२३ :- ६३ - ४५.००
२०२३-२४ :- ८८ - ६२.८६
२०२४-२५ :- १०१ - ७२.१५
संत्रा निर्यातीला ब्रेक
नागपुरी संत्र्याच्या बांगलादेशातील निर्यातीला सन २०२१-२२ मध्ये ब्रेक लागला. ही निर्यात पूर्ववत करणे व वाढविण्यासाठी तसेच देशाअंतर्गत बाजारात नागपुरी संत्र्याची माेठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अजूनही प्रभावी उपाययाेजना करायला तयार नाहीत. याचा फायदा काही व्यापारी घेतात. देशाअंतर्गत बाजारात संत्रा विक्रीचे प्रभावी नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांना १५ ते २० रुपये प्रतिकिलाे दराने संत्रा विकावा लागत असून, हाच संत्रा ग्राहकांना ६० ते ८० रुपये प्रतिकिलाे दराने खरेदी करावा लागताे.
नागपुरी संत्र्याला सरासरी ३० ते ३५ हजार रुपये प्रतिटन भाव मिळायला हवा. सन २०२२ मध्ये काही शेतकऱ्यांना ४८ हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला हाेता. मध्यंतरी संत्र्याचे दर ५० ते ६० हजार रुपये प्रतिटनावर गेले हाेते. संत्र्याचे याेग्य मार्केटिंग आणि विक्री नेटवर्क निर्माण केल्यास हा दर मिळणे कठीण नाही.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.