नंदुरबार : दुधाच्या दरातील चढ-उतारामुळे दुग्धोत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले होते. मार्च महिन्यापर्यंत ही योजना राज्यभर अस्तित्वात होती. खान्देशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही याचा लाभ झाला; परंतु नंदुरबार जिल्ह्यात दर दिवशी पाच लाख लिटर दुधाचे उत्पादन घेणारे दुग्धोत्पादक या योजनेपासून वंचित आहेत. जनावरांचे मालकांसोबतचे न होणारे आधार लिंक आणि अवसायनात गेलेल्या संस्थांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
साधारण २० वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात २२६ सहकारी संस्थांच्या माध्यमातून ११ हजार ९४७ सभासद • दरदिवशी दुग्धोत्पादन करून तीन संघांना पुरवठा करत होते. यातून नंदुरबार जिल्ह्यातून शासकीय डेअरीसाठी दुधाचा पुरवठा होऊन दुग्धोत्पादकांना लाभ मिळत होता. कालांतराने जिल्ह्यातील तळोदा येथील दूध संघ अवसायनात, तर नंदुरबार आणि शहादा येथील सहकारी दूध संघ कागदोपत्री सुरू आहेत. २० वर्षात या संघांची प्रगती शून्य असल्याने ११ हजार दुग्धोत्पादकांनी आपला मोर्चा खासगी संस्थांकडे वळवला होता. गेल्या काही वर्षांत खासगी संस्थांकडूनही २७ रुपयांपेक्षा कमी दर गाय आणि म्हशीच्या दुधाला देण्यात येत आहे.
दुग्धोत्पादकांना मिळणाऱ्या कमी दरामुळे शासनाकडून सहकारी आणि खासगी संस्थांना प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन महिने ही योजना राज्यात सुरू असताना नंदुरबार जिल्ह्यातून केवळ एकाच दूध संकलन केंद्राला नोंदणी करता आली होती. या संघातही खान्देशाबाहेरचे दुग्धोत्पादक दुधाचा पुरवठा करत असल्याने त्यांना ऑनलाईन पद्धतीने लाभ दिला गेला; परंतु नंदुरबार जिल्ह्यातील एकाही दुधोत्पादकला योजनेचा लाभ मिळालेला नाही.
जिल्ह्यातील दुग्धोत्पादकांना योग्य प्रकारे नोंदण्या नसल्याने लाभ मिळालेला नाही. लाभ मिळवण्यासाठी खासगी संस्थेकडे नोंदणी करताना आपल्या जनावरांचे आधार लिकिंग आपल्या 'आधार'सोबत करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दूधसंकलन करणाऱ्या एकाच संस्थेला शासनाने युजरनेम दिला आहे. त्यांच्याकडून त्यांच्या सभासदांना लाभ दिला जात आहे.
-डॉ. अमितकुमार पाटील, जिल्हा दुग्धविकास अधिकारी, नंदुरबार
दर दिवशी पाच लाख लिटर दूध उत्पादन
नंदुरबार जिल्ह्यात दरदिवशी ५ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. हे दूध प्रामुख्याने गुजरात राज्यातील खासगी दूध संघ खरेदी करतात. संकलन संस्थांच्या माध्यमातून हे दूध शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. जिल्ह्यातून दूध खरेदी करणाऱ्या वसुधारा आणि सुमूल या दोन खासगी संघांत दूध जात असल्याने त्यांच्या माध्यमातून ५ रुपयांचे अनुदान देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; परंतु यातील एकाही संघाला शासनात नोंदणी करता आली नाही. राज्य शासनाने जाहीर केलेले पाच रुपयांचे अनुदान फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांपर्यंत दुग्धोत्पादकांना मिळाले आहे. आचारसंहितेमुळे हे अनुदान बंद झाले आहे. आगामी काळात अनुदान मिळते किंवा कसे, याची माहिती शासनाकडून दिली जाणार आहे.
दुग्धविकास कार्यालय धुळ्याला...
खासगी संस्थांना पाच रुपये अनुदान दुग्धोत्पादकाला देता यावे, यासाठी शासनाने ऑनलाइन प्रणाली विकसित केली होती. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर अनुदान वितरित करताना ऑनलाइन पद्धतीने कॅश पेमेंट करणे बंधनकारक केले होते. या बँक खात्याला जोडलेल्या आधार लिंकसोबत दुग्धोत्पादकाच्या दुभती गाय किंवा म्हशीचा आधार लिंक करणे सक्त्तीचे होते. नंदुरबार जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून साडेसहा लाख गुराढोरांपैकी दोन लाखांपेक्षा कमी गुरांचे आधार काढण्यात आले आहे. गुरांच्या कानांवर असलेले बिल्ले नसल्याने शासनाकडून पाच रुपयांचे अनुदान संबंधित दुग्धोत्पादकाच्या खात्यावर आलेच नाहीत. परिणामी दूध देऊनही उत्पादकाला लाभ मिळाला नाही.
नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन २५ वर्षाचा काळ लोटला आहे; परंतु यानतरही काही शासकीय विभाग अद्यापही धुळ्यातून कामकाज करत आहेत. यात दुग्धविकास कार्यालयाचाही समावेश आहे. धुळे येथील कार्यालयातूनच नंदुरबार जिल्ह्याचे कामकाज सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात दुग्धविकासाच्या योजनाही अधांतरी आहेत.
एकच संस्था मंजूर
सध्या जिल्ह्यात शहादा तालुक्यातील लांबोळा येथे दूधसंकलन केंद्रात जिल्ह्यातील दुग्धोत्पादक दूध पाठवतात. या संस्थेला पाच रुपये अनुदानासाठी शासनाने परवानगी दिली आहे: परंतु या ठिकाणी अनुदानाचा लाभ घेणारे लाभार्थी हे धुळे. जळगाव आणि जालना जिल्ह्यांतील आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील एकाही लाभार्थ्यांच्या खात्यावर येथे दूध देऊनही अनुदान मिळत नसल्याची माहिती धुळे येथील दुग्धविकास कार्यालयाने दिली आहे.