अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल (Loksabha Election Result) जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. यात नागरिकांसह शेतकऱ्यांचा रोषही दिसून आला. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmer) स्थानिक सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना चांगला दणका दिला. महाराष्ट्रातील (maharashtra Loksabha Elections) जवळपास सहा मतदारसंघातील हे उमेदवार आहेत, ज्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. ते सविस्तर पाहूयात.
डॉ. पवार यांच्या पराभवाचे कारण
एकीकडे लोकसभा निवडणुकांची (loksabha Election Result 2024) रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात मात्र कांद्याचा प्रश्न पेटला होता. नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा येथील दोन्हीही खासदार सत्ताधारी पक्षातील होते, मात्र तरी देखील कांद्या प्रश्नावर निश्चित असा तोडगा हे दोन्हीही खासदार काढू शकले नाही. अनेकदा शेतकऱ्यांकडून आंदोलन झाली, निवेदने देण्यात आली. मात्र कांदा प्रश्नावर ठोस निर्णय न घेतल्यामुळे दिंडोरी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षातील केंद्रीय मंत्री असलेल्या डॉ. भारती पवार (Dr. bharati Pawar) यांचा दारुण पराभव झाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार पवार यांना कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मागणी करण्यात आली. मात्र शेवटपर्यंत या प्रश्नावर शेतकऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही.
हेमंत गोडसेंना फटका
त्यानंतर नाशिक लोकसभेवर दोनदा खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना देखील पराभवाला सामोरे जावं लागलं. नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न अनेक दिवसांपासून गाजत असताना भारती पवारांसोबतच हेमंत गोडसे यांच्याकडे देखील शेतकऱ्यांनी आशेने पाहिले. डिसेंबर पासून सुरू असलेली निर्यात बंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलन करत गोडसे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र निर्यात बंदी कायम ठेवत केंद्र सरकारने आणखी पाय खोलात घातला. लोकसभेच्या शेवटच्या क्षणी निर्यात खुली करत दिलासा देण्याचा प्रयत्न झाला, मात्र निर्यात शुल्कात कुठलाही दिलासा नसल्याने हा प्रयत्न देखील शेतकऱ्यांनी हाणून पाडल्याचे निवडणूक निकालावरून दिसून आले.
नंदुरबारात काय घडलं?
त्याचबरोबर कांदा हा नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. या ठिकाणी हिना गावित विरुद्ध गोपाल पाडवी असा सामना रंगला होता. मागील दोन टर्म हिना गावित या येथील खासदार राहिल्या होत्या. मात्र कांदा प्रश्न सुटत नसल्याने येथील शेतकरी वर्ग नाराज असल्याचा दिसून आलं होतं. त्यामुळे यंदा येथील कांदा फॅक्टर देखील पाडवी यांच्या विजयाचा शिल्पकार ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. विशेष यंदाचं या पट्ट्यात लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादन दिसून आले. म्हणूनच नंदुरबार बाजार समिती देखील सुरु करण्यात आली.
शिरूर, शिर्डी, धुळे, अहमदनगरला काय घडलं?
यानंतर पुण्यातील शिरूर लोकसभा, शिर्डी लोकसभा, अहमदनगर लोकसभा, धुळे लोकसभा या मतदारांसघातील उमेदवारांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. अहमदनगर जिल्ह्यात देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असलेली निर्यातबंदी, मिळणारा कवडीमोल बाजारभाव, कांदा प्रश्नाकडे झालेले दुर्लक्ष या सगळ्यांचा फटका अहमदनगरमध्ये सुजय विखे, धुळे लोकसभेचे डॉ. सुभाष भामरे, शिरूर लोकसभेचे आढळराव पाटील आणि शिर्डी लोकसभेचे सदाशिव लोखंडे यांना पराभव स्वीकारावा लागला.