Nashik Devrai : गोष्ट आहे शंभर एकरवर झाडं, फुलं, पानं फुलविणाऱ्या आणि विविध पक्षी, प्राणी यांना हक्काचं घर बनविणाऱ्या वनमॅनची... जिथं झाडं होती, पण जंगल म्हणावं असं काही नव्हतं, ना पक्ष्यांचा किलबिलाट, ना प्राण्यांची चाहूल, नुसतंच उघडं बोडकं जंगल, हेचं उघडं बोडकं जंगल खऱ्या अर्थाने हिरवं करायचं ठरवलं, बदलायचं ठरवलं आणि उभी राहिली नाशिकची देवराई...
नाशिक वनपरिक्षेत्रातील (Nashik) सातपूरजवळील फाशीचा डोंगर म्हणून ओळख असलेल्या राखीव वनामध्ये देशी प्रजातीच्या हजारो वृक्ष, वेली, झुडपांची लागवड करून मागील दहा वर्षांपासून 'आपलं पर्यावरण संस्था' (Aapal Paryavaran) संवर्धन करत आहे. पूर्वी या डोंगराला फाशीचा डोंगर असं म्हटलं जायचं, याच ठिकाणी दहा वर्षांपूर्वी ११ हजार झाडांच्या लागवडीचा श्री गणेशा करण्यात आला. आणि आजमितीस जवळपास ३३ हजाराहून अधिक झाडांचं जंगल इथं उभं राहिलं आहे. याचं श्रेय आपलं पर्यावरण संस्था आणि शेखर गायकवाड (Shekhar Gaikawad) यांना जातं.
शेखर गायकवाड, पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना झाडं लावण्याचा, नुसतं लावण्याचाच नाहीतर ती जगवण्याचा लळा लागला आहे. ते गेल्या २७ वर्षांपासून वृक्ष लागवडीचे काम करीत आहेत. हे करत असताना हिरवंगार जंगलच उभं करण्याचं ठरवलं... त्या अनुषंगाने नाशिकच्या पश्चिमेस असलेल्या सातपूर भागातील फाशीचा डोंगर डोळ्यासमोर आला. आणि इथंचं नाशिकची देवराई उभं करण्याचा निर्णय झाला. या ठिकाणी राखीव वनाचे हे क्षेत्र २०१५ सालापर्यंत गिरीपुष्प वृक्षांचे एकप्रकारे मृत जंगल होते. मात्र आता हिरवीगार देवराई फुलली आहे. या शंभर एकरांवर उभ्या राहिलेल्या देवराईत गायकवाड यांचा सिहांचा वाटा आहे.
आता या वनविभागाच्या राखीव वन कक्षामध्ये 'नाशिक देवराई' अस्तित्वात आली आहे. 'आपलं पर्यावरण' संस्थेकडून मागील दहा वर्षांपासून याठिकाणी देशी प्रजातीच्या रोपांची लागवड व संवर्धनाचे मिशन हाती घेतले. आता हजारो रोपट्यांचे वृक्षराजीत रूपांतर झाले आहे. जवळपास दहा वर्षांपासून जपलेल्या जंगलात आज कित्येक वन्यजीवांनी हक्काचा अधिवास निर्माण केला आहे. शेखर गायकवाड यांनी ठरवलं अन् मृत जंगलही जिवंत केलं .... अन् नाशिकसाठीच नव्हे तर इतरांसाठीही निसर्ग अभ्यासाचे केंद्र बनलं आहे.
एवढं सगळं उभं राहिलं ....
फाशीच्या डोंगराचे ५ जून २०१५ रोजी 'देवराई' नामकरण करीत नाशिकमध्ये पहिल्यांदा ११ हजार देशी प्रजातींची रोपे लावण्यात आली. २०१८ मध्ये एक हजार जंगली वेली, २०१९ मध्ये पाचशे जंगली झुडपे, २०२० मध्ये चारशे देशी रोपांची लागवड झाली. यासह २०२१ मध्ये कंदमुळांसह घनवनाची सुरुवात करून २०२२ मध्ये बांबूची लागवड करण्यात आली. आजमितीस या देवराईत २४० प्रजातींची ३३,००० देशी झाडे, ५० प्रजातीच्या वेली, ५० प्रकारची फुलपाखरे, पाच वेगवेगळे धनवन, ३२ प्रकारच्या बांबूच्या प्रजातीं, ४८ प्रजातीची झुडपे, ३ बिबटे, १ तरस तसेच विविध दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास इथे असल्याचे गायकवाड सांगतात.
आता प्रत्येक झाडांना क्यू आर कोड
सातपूरच्या फाशीच्या डोंगरावर 'देवराई' साकारली आहे. त्यासाठी शेखर गायकवाड यांच्या नेतृत्वात दहा वर्षांत ही देवराई बहरली आहे. आता नाशिक देवराईमध्ये आता प्रत्येक झाडाला क्यूआर कोड लावलेत जात आहे. आतापर्यंत साधारण 90 झाडांचे क्यूआर कोड तयार झालेले आहेत. तो क्यू आर कोड 'स्कॅन' केल्यास झाडांची माहिती त्याच्या मूळ नावासह मराठीत उपलब्ध होईल. त्यामुळे देवराईत येणाऱ्या लोकांना झाडांची माहिती व्हावी व निसर्गाच्या रूपात एक जिवंत वाचनालय लोकांना मिळावे या धर्तीवर पण काम सुरू आहे.