नाशिक : आज मंगळवार 02 एप्रिल रोजी इगतपुरी विभागीय कृषी संशोधनाच्या माध्यमातून पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे. आकाश आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान ३६-४० डिग्री सें. व किमान तापमान २०-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग १३-१६ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
वाढत्या तापमानापासून संरक्षणासाठी...
तसेच उष्ण हवामान लक्षात घेता मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकाचे अवशेष, पेंढा/ पॉलिथिन/ गवतांचा आच्छादन म्हणून वापर करावा. वाढत्या तापमानाचा अंदाज लक्षात घेता सल्ला देण्यात येतो कि पशुधन, शेळी/मेंढी , कुक्कुट तसेच स्वतःचे उन्हापासून संरक्षण करावे. उन्हाळी पिकात सूक्ष्म सिंचनाचा (उदा. तुषार सिंचन) उपयोग करून पाण्याची बचत करावी. वाढत्या तापमानाच्या अंदाज घेता जनावरांना दुपारी शेड खाली बांधावे व दुपारी ११ ते १५ तासांच्या दरम्यान चार देणे टाळावे.
वाढते तापमान व पाण्याच्या अभावाखाली शेतकर्यांना सल्ला देण्यात येतो कि फळ व भाजीपाला पिकांमध्ये मल्चिंगचा वापर करून बाष्पीभवनाच वेग कमी करावा. धान्य कडक उन्हात वाळवून साठवणूक करावी. साठवणुकीच्या वेळी औषध वापरावे. कापणी केलेल्या द्राक्ष बागेतील रोपांची एप्रिल छाटणी सुरु करावे आणि रोपांची छाटणी नंतर १ टक्के B. M. ( बोर्डोमिश्रण) ची फवारणी करावी. नवीन लावलेल्या फळझाडांना गवताचे शेड करून तीव्र सुर्यकिरणांपासून त्यांचे संरक्षण करावे. तापमानाचा अंदाज लक्ष्यात घेता उन्हाळी पिकांना पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या (८० ते ८५ % पक्व ) आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या साह्याने सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी चारनंतर करावी.
कृषी सल्ला
उन्हाळी बाजरीसाठी....
उष्ण हवामानाचा अंदाज लक्षात घेता पोटरी अवस्थेत असलेल्या बाजरी पिकाला पाण्याची दुसरी पाळी 35 ते 45 दिवसांनी द्यावी. पाण्याच्या दुसऱ्या पाळी अगोदर पिकास हलकी भर दिल्यास, जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. पीक जास्त वाऱ्यावर लोळत नाही.
उन्हाळी भुईमुगासाठी....
वाढते तापमान लक्षात घेवून दोन पाण्याच्या पातळीतील अंतर कमी करुन शक्यतो सायंकाळी पाणी द्यावे. पीक २० दिवसांचे झाल्यावर फुले येईपर्यंत एक खुरपणी व दोन कोळपण्या करून पीक तणविरहित ठेवावे. आऱ्या निघाल्यानंतर कोणतीही आंतरमशागतीची कामे करू नयेत. आऱ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर एकदा आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी एक मोठा रिकामा ड्रम पिकावरून फिरवावा. त्यामुळे आऱ्याचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते.
रब्बी गव्हासाठी ....
धान्य कडक उन्हात वाळवून साठवणूक करावी. साठवणुकीच्या वेळी औषध वापरावे. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. अलीकडे पीक कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाच वेळी कम्बाइन हार्वेस्टरच्या सहाय्याने केले जाते. त्यामुळे वेगाने काम होते.
सौजन्य
ग्रामीण कृषी मौसम सेवा
कृषि हवामान प्रक्षेत्र विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
ता. इगतपुरी, जि. नाशिक