नागपूर : देशात एका वर्षाला सरासरी २७० ते २९० लाख टन कांद्याचे उत्पादन हाेत असून, सरासरी मागणी १७० ते १८० लाख टन एवढी आहे. यातील १० ते १२ टक्के कांद्याची घट हाेते. त्यामुळे देशात सरासरी किमान ५२ ते ५७ लाख टन कांदा शिल्लक राहाणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात कांद्याची राेजची सरासरी १ लाख २५ हजार क्विंटल आहे. दर महिन्याला निर्यात किमान २ ते २.५० लाख असायला हवी. मात्र, सरकार केवळ ५० हजार टनवर थांबून आहे.
देशभरात मागील रब्बी हंगामाच्या तुलनेत चालू रब्बी हंगामात कांद्याच्या लागवड क्षेत्रात १.२४ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरातील कांदा लागवड क्षेत्र ६.३२ लाख हेटरवरून ७.५६ लाख हेक्टरवर पाेहाेचले आहे. मध्यंतरी कांद्याला चांगला दर मिळाल्याने दक्षिण भारतात कांदा लागवड क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे देशभरात यावर्षी कांद्याच्या उत्पादनात वाढ हाेणार आहे. देशातील कांद्याचे एकूण उत्पादन, साठवणुकीतील घट आणि मागणी विचारात घेता किमान ५२ ते ५७ लाख टन किंवा त्यापेक्षा अधिक कांदा शिल्लक राहणार आहे.
केंद्र सरकारने फेब्रुवारी, मार्चमध्ये तीन लाख टन कांदा निर्यातीची घाेषणा केली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांत सरकारने यू-टर्न घेऊन ही निर्यात ५० हजार ४०० टन आणि आता केवळ ५० हजार टन कांदा बांगलादेशात ‘एनसीईएल’च्या माध्यमातून निर्यात करणार असल्याचे जाहीर केले. ही निर्यात रमजान महिना सुरू हाेण्यापूर्वी करणे अपेक्षित असताना एनसीईएलने कांदा निर्यातप्रक्रियेला अद्याप सुरुवात केली नाहीत, अशी माहिती एनसीईएलच्या सूत्रांनी दिली.
एनसीईएलची निर्यातीतही लिलाव पद्धती
निर्यातीसाठी लागणारा कांदा खरेदी करण्यासाठी लिलाव पद्धतीने टेंडर काढले जातील. जी कंपनी कमी दरात कांदा खरेदी करून देईन, त्यांच्याकडून कांदा खरेदी केला जाईल. हा कांदा बांगलादेशातील जी कंपनी अधिक दरात खरेदी करेल, त्यांना विकला जाईल. ही विक्री लिलाव पद्धतीने केली जाईल, अशी माहिती एनसीईएलच्या सूत्रांनी दिली असून, हा निर्णय मंगळवारी (दि. ५) घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एनसीईएल निकृष्ट कांदा निर्यात करणार काय?
एनसीईएल कमी दरात कांदा खरेदी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी दरात साधारण किंवा निकृष्ट प्रतिचा कांदा मिळताे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांसह निर्यातदारांनी दिली. हा कांदा महागात विकण्याचा निर्णय एनसीईएलने घेतला आहे. बांगलादेश साधारण कांदा महागात खरेदी करणार काय? असा प्रश्न उपस्थित हाेताे. हा ग्राहक गमावण्याचा प्रकार असल्याचे शेतमाल बाजार तज्ज्ञ सांगतात.
गुजरातचा कांदा निर्यातीची शक्यता
एनसीईएल नाफेडकडून कांदा खरेदी करण्याची दाट शक्यता आहे. नाफेडने सध्यात नाशिकसह राज्यातील इतर जिल्ह्यांत कांदा खरेदी जवळपास बंद केली आहे, तर गुजरातमध्ये वाढविली आहे. त्यामुळे एनसीईएल नाशिकच्या दर्जेदार कांद्याऐवजी गुजरातचा कांदा निर्यात करण्याची शक्यता बळावली आहे.