नागपूर : रमजान महिन्यात मुस्लीम राष्ट्रांना कांद्याची नितांत आवश्यकता असते. नेमकी हीच बाब हेरून पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने त्यांच्या शेजारी राष्ट्रांसाठी महिनाभर कांदा निर्यातबंदी करण्याबाबत ‘द ट्रेड डेव्हलपमेंट अथाॅरिटी ऑफ पाकिस्तान’ (टीडीएपी)ला त्यांचा अभिप्राय मागितला आहे. यातून त्यांनी भारताचे ग्राहक देश वगळले आहेत. भारतात आधीच दीर्घकाळ कांदा निर्यातबंदी तसेच तस्करी सुरू असल्याने ती आणखी वाढणार आहे. शिवाय, भारत नियमित ग्राहक देश गमावण्याची शक्यता बळावली आहे.
१२ मार्चपासून रमजान महिन्यास प्रारंभ हाेत असल्याने बांगलादेशने भारताकडून कांदा खरेदीला सहमती दर्शविली हाेती. त्यांना १२ मार्चपूर्वी कांदा हवा असून, भारताने ५० हजार टन कांदा निर्यातीची प्रक्रिया अद्याप सुरू केली नाही. कांदा खरेदी करून ताे बांगलादेशपर्यंत पाेहाेचविण्यासाठी किमान ११ दिवस लागतात.
कांदा निर्यातीचा विचार करता अफगाणिस्तान, इराण व आखाती देश पाकिस्तानचे तर बांगलादेश, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, युराेपियन राष्ट्र हे भारताचे ग्राहक देश आहेत. रमजान महिन्यामुळे यातील मुस्लीम राष्ट्रांना कांद्याची आवश्यकता भासणार आहे. त्यांची ही गरज भारतीय तस्कर कांद्याची तस्करी करून पूर्ण करण्याची व माेठ्या प्रमाणात पैसे कमावत आहे. एप्रिलमध्ये पाकिस्तानसह बांगलादेशचा कांदा बाजारात येणार आहे. महिनाभरानंतर पाकिस्तान कांदा निर्यात सर्वांसाठी खुली करेल.
पाकिस्तान कांदा निर्यातबंदीच्या तयारीत
पाकिस्तान सरकार महिनाभर (१२ मार्च ते ११ एप्रिल) आखाती देशांसाठी कांदा आणि इराण व अफगाणिस्तानसाठी केळी निर्यातबंदी करण्याचा विचार करीत आहेत. ते सर्व पाकिस्तानचे शेजारी राष्ट्र असून, नियमित ग्राहक आहेत. या देशांकडून पाकिस्तानला कांदा निर्यातीतून कमी पैसे मिळतात. दुसरीकडे, निर्यातबंदीमुळे महत्त्वाचा कांदा पुरवठादार देश असलेला भारत बाजारात नसल्याचा पुरेपूर फायदा घेत पाकिस्तानने भारताचे ग्राहक असलेल्या देशांमध्ये कांदा निर्यात खुलीच ठेवली आहे. कारण, या देशांकडून पाकिस्तानला अधिक पैसे मिळतात.
...
बांगलादेशात जाताे तस्करीचा कांदा
हंगामात भारतातून बांगलादेशात राेज ७ ते ७.५ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात व्हायचा. बंदीमुळे निर्यात थांबली असली तरी भारतातून बांगलादेशात राेज ३ ते ३.५ हजार मेट्रिक टन कांद्याची तस्करी सुरू आहे. घाेजाडांगा येथील सीमेवरून भारतीय कांदा तस्करीचे कंटेनर बांगलादेशात राेज मध्यरात्रीनंतर पास केले जातात. दीर्घकाळ कांदा निर्यातबंदी धाेरणामुळे देशांतर्गत बाजारात दर काेसळल्याने कांदा उत्पादकांसह व्यापारी, निर्यातदार यांचे माेठे आर्थिक नुकसान साेसावे लागत आहे, तर तस्कर कस्टमसह काही महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी माेठ्या प्रमाणात पैसे कमावत आहेत.
...
इतर देशांमधील कांद्याचे दर
दुबई - ९६ रुपये/प्रतिकिलाे
बांगलादेश - ७० रुपये/प्रतिकिलाे
श्रीलंका - १०० रुपये/प्रतिकिलाे
मलेशिया - ११० रुपये/प्रतिकिलाे