नाशिक : पूर्वीच्या काळी आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळात बाजरी, ज्वारी, नाचणी यासारखे पौष्टीक अन्न (मिलेट) आहारात समाविष्ट असायचे. मात्र नंतरच्या काळात गुलामीच्या मानसिकेतून त्याला (गव्हाच्या तुलनेत) कमी प्रतिष्ठा मिळाली. परिणामी हे अन्न सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरातून हद्दपार झाले. मात्र आता पुन्हा सुपरफूड म्हणून तृणधान्य खाण्याकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त मिलेटचा प्रचार प्रसार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी यंदा साजरे होत असलेल्या मिलेट विषयाकडे युवकांचे लक्ष वेधले. मोदी म्हणाले की, पूर्वीच्या काळी आपले पूर्वज बाजरी, ज्वारी, नाचणी या सारखे तृणधान्य आपल्या आहारात समाविष्ट करत असत. मात्र कालांतराने हे तृणधान्य मागे पडत गेले. मात्र आता पुन्हा याच तृणधान्याला मोठं महत्व प्राप्त झालं असून मिलेट पदार्थ जपणे महत्वाचे झाले असल्याचे मोदी यांनी सांगितले.
पीएम नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, यंदाचं हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्या दृष्टीने सर्वच स्तरावरून जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने मिलेटला ‘श्रीअन्ना’चा दर्जा दिला आहे. आंतरराष्ट्रीय मिलेटच्या वर्षात देशातील युवकांना तृणधान्याचे ब्रँड अँबेसेडर व्हावे, त्यातून देशातील छोट्या शेतकऱ्यांना पाठबळ मिळेल, असे आवाहन आजच्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना केले.
यंदाच हे मिलेट वर्ष
भरडधान्य, मिलेट्स म्हणजे ज्वारी, नाचणी, बाजरी, लहान बाजरी. उदा. कुटकी, कोडो, सावा अशी धान्यं. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून त्यांना ‘पौष्टिक तृणधान्य’ किंवा न्यूट्री-सीरियल म्हटले जाते. भारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भरडधान्यात भरपूर प्रमाणामध्ये तंतुमय घटक असतात. तंतुमय पदार्थामुळे मिलेट्समधील कर्बोदकांचे अभिशोषण म्हणजेच ॲबसाॅर्बशन अगदी हळू होते. म्हणजे त्यांचा ग्ल्यासेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यांचा उपयोग आपल्याला अनेक गोष्टींसाठी होऊ शकतो. एक तर यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करायला मदत होते. रक्तातील ग्लुकोज पटकन वाढत नाही आणि त्यामुळे आपल्या मधुमेह नियंत्रणात राहायला याची मदत होते. एकूणच गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वेगवगेळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तृणधान्यांचे महत्व अधोरेखित करण्यात येत आहे.