अनियमित पावसामुळे यंदा शेती उत्पादनांचा मोठा फटका बसला आहे. देशांतर्गत उत्पादन कमी झाल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये चणचण भासू नये यासाठी केंद्र सरकारने अनेक उत्पादनांच्या निर्यातीवर निर्बंध लादले. यामुळे कृषी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये ही निर्यात घटून 18 लाख टनांवर आली.
एकीकडे अवकाळी पाऊस दुसरीकडे केंद्र सरकारने अनेक पिकांवरील निर्यात शुल्क वाढविल्याने कृषीमाल निर्यातीत घट होऊ लागली आहे. ऑगस्टमध्ये हेच प्रमाण 27.94 लाख टन इतके होते. कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्नउत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीडा) वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून हे चित्र समोर आले. पहिल्या सहामाहीत 172.27 लाख टनांचा कृषिमाल निर्यात केला. कांदा निर्यातही कमी तुकडा तांदूळ, बिगरबासमतीसह अन्य उत्पादनांवर अंकुश लावल्याने निर्यात सप्टेंबरमध्ये 17.93 लाख टनांवर आली. ऑगस्ट 2023-24 मध्ये 27.94 लाख टनांच्या कृषी उत्पादनांची निर्यात झाली. या मालाचे एकूण मूल्य 18 हजार 128 कोटी इतके होते. सप्टेंबरमध्ये 4.25 लाख टन इतक्या बिगरबासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. 1.21 लाख टन बासमती तांदूळ, 1.51 लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली.
बारीक तांदळाची निर्यात मंदावली
केंद्र सरकारने बासमती तांदळाच्या निर्यात मूल्यात मोठी वाढ केल्याने बारीक तांदळाची निर्यात मंदावली आहे. त्यामुळे या तांदळाच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. जाड्या बीपीटी तांदळाचे दर एमएसपीच्या खाली असून सरकार धान एमएसपी दराने खरेदी करण्यास दिरंगाई करत आहे. सरकारने ध्यानाचा बोनस अद्यापही जाहीर केला नाही. दुसरीकडे बांगलादेश सरकारने 2019 मध्ये संत्र्यावर प्रति किलो 20 रुपये शुल्क लावला हा शुल्क या वर्षी 88 रुपये प्रति किलो करण्यात आला आहे त्यामुळे नागपुरी संत्र्याची निर्यात देखील 60 टक्क्यांनी घटल्याचे समोर आला आहे.
खाद्यतेलाची आयात, सरकीचे दर उतरले!
कापसाच्या बाबतीतही सरकीचे दर कमी झाल्याने तसेच खाद्यतेलाची आयात केली जात असल्याने सरकीचे दर उतरले आहेत. कापसाच्या कमी गाठींच्या आयात करून देशांतर्गत अधिक गाठींचे दर दबाव ठेवण्याचे कारस्थान कापड उद्योजक करत असल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे देशांतर्गत व जागतिक बाजारात कापसाचे दर समांतर आहेत. कापड उद्योगातून सूत व रुईची मागणी कमी झाली आहे. तसेच सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 35 टक्क्यांनी कमी केले असून पाम सूर्यफूल व सोयाबीनच्या कच्च्या तेलाचे आयात सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचा भाव 5300 प्रतिक्विंटल होता. तो घसरून आता 4900 पर्यंत खाली आला आहे.