- सुनील चरपे
नागपूर : साप हा वन्यजीव नाही. त्यामुळे सर्पदंश (Snake Bite) हा विषय वन विभागाच्या अखत्यारीत येत नाही, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. साप काेणत्या प्रकारात येताे, ते मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास भरपाई देण्याची जबाबदारी कृषी विभागावर (agriculture Department) साेपविली आहे. सर्पदंशामुळे मृत्यू झालेली व्यक्ती शेतकरी नसल्यास त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणार काेण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वन विभागाच्या (forest Department) शेड्यूलमध्ये सापाच्या २५ ते ३० जातींचा समावेश केला आहे. साप कुठेही आढळून येत असल्याने प्रत्येक जातीच्या सापाचा यात समावेश नाही. सर्पदंशाच्या घटना टाळता येऊ शकतात. इतर वन्य प्राण्यांच्या तुलनेत सापांचे रेस्क्यू साेपे असून, सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. सर्पदंशामुळे मृत्यू हाेणाऱ्यांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात वन विभागाने हात वर करीत ही जबाबदारी कृषी विभागावर साेपविली आहे.
सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई देण्याची तरतूद कृषी विभागाच्या गाेपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा याेजनेत केली आहे. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असणे अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे शेती नाही किंवा सातबारावर कुटुंबीयांचे नाव नाही, अशा शेतमजूर व इतर व्यक्तींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणार काेण, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
साप मारल्यास सात वर्षांची शिक्षा
सापांना वन्यजीव सुरक्षा कायद्यात समाविष्ट केले आहे. त्यामुळे एखाद्याने साप पकडल्यास किंवा मारल्यास त्याला कायद्यानुसार दाेन ते सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा हाेते. वन विभागाच्या कारवायांमुळे गारुड्यांनी सापाचे खेळ दाखविणे बंद केले आहे.
दरवर्षी साडेचार हजार जणांचा मृत्यू
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार भारतात दरवर्षी सुमारे ५० लाख लाेकांना सर्पदंश होताे. यात सुमारे २७ लाख साप विषारी असतात. विषारी सापाच्या दंशामुळे देशात सरासरी १ लाख १०, तर महाराष्ट्रात चार ते पाच हजार नागरिकांचा मृत्यू हाेताे. सर्पदंशामुळे सरासरी चार लाख लाेकांवर अवयव कापण्याची म्हणजेच अपंगत्वाची वेळ ओढवते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ याेजना
संर्पदंशामुळे शेतकरी नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ याेजनेंतर्गत २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील असणे अनिवार्य आहे. ही याेजना महसूल विभागाच्या माध्यमातून राबविली जाते.
सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गाेपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा याेजनेंतर्गत आर्थिक मदत केली जाते. अनेक शेतकऱ्यांना या याेजनेची माहिती नाही. कृषी विभाग याबाबत प्रबाेधन करीत नाही. ज्या शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांना या याेजनेत सहभागी करून घेणार का?
- मिलिंद दामले, अध्यक्ष, शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडी, महाराष्ट्र.