-सुनील चरपे
नागपूर : राज्यात नाफेड व एनसीसीएफद्वारे (Nafed) एमएसपी दराने केल्या जाणाऱ्या साेयाबीन खरेदीची (Soyabean Kharedi) मुदत रविवारी संपली आहे. या खरेदीला मुदतवाढ देण्याची घाेषणा पणनमंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी बुधवारी केली. मात्र, नाफेड, एनसीसीएफ व पणनच्या अधिकाऱ्यांना या मुदतवाढीचे ताेंडी अथवा लेखी रविवारी रात्रीपर्यंत प्राप्त झाले नव्हते. यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती पणनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बारदान्याअभावी राज्यातील नाफेडच्या बहुतांश केंद्रावरील साेयाबीन खरेदी बंद आहे. हा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे विशेष बैठक पार पडली. या बैठकीत साेयाबीन खरेदीच्या सात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. साेयाबीन खरेदी मुदतवाढीचा या बैठकीच्या इतिवृत्तात उल्लेख नाही.
याच बैठकीत साेयाबीन खरेदी मुदतवाढीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी प्राप्त हाेताच, मुदतवाढीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती पणनच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे साेयाबीन खरेदीवर सध्यातरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंजुरीसाठी आणखी किती दिवस ?
नाफेड व एनसीसीएफ या दाेन्ही संस्था केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करतात. राज्य सरकारच्या पणन मंत्रालयाने केंद्राकडे गुरुवारी (दि. ९) साेयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला. चार दिवस पूर्ण हाेऊनही केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही.
बारदान्यासाठी आठवडा
नाफेडने गुरुवार (दि. १६) पर्यंत बारदान्याची व्यवस्था करावी, असे निर्देश पणनमंत्री रावल यांनी या बैठकीत दिले. नाफेडला राज्यात १४.१३ लाख पैकी किमान आठ लाख मेट्रिक टन साेयाबीन करण्याचे उद्दिष्ट हाेते. यातील ३.३० लाख मेट्रिक टन साेयाबीन त्यांनी खरेदी केले. एवढ्या साेयाबीनसाठी नेमक्या किती बॅगची आवश्यकता असते, हे नाफेडच्या अधिकाऱ्यांना कळू नये, याबाबत नवल वाटते.
३१ जानेवारीपर्यंतचा प्रस्ताव
साेयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुदतवाढ मागितली जाईल, असेही पणनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महिनाभरात दाेन्ही संस्था उर्वरित ८.७५ लाख मेट्रिक टन साेयाबीन करतील काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.