- बाळासाहेब अस्वले
नाशिक : दुष्काळाची परिस्थिती, कमी जमीन... यासारखे संकट समोर असताना बुद्धी, चिकाटी, नवीन प्रयोग करण्याची क्षमता व कल्पकतेच्या ताकदीवर शिवनई ता. दिंडोरी येथील गणपतराव घुमरे यांनी २८ गुंठे पॉलिहाऊसमध्ये काकडीचे ((Cucumber Farming) विक्रमी उत्पादन देणारी अप्रतिम अशी बाग तयार केली आहे. एक बाजूला दुष्काळ आहे... इतर पिकांना भाव नाही.. अशा गर्तेत शेतकरी सापडले असताना बाजारपेठेचे मागणी ओळखून काकडीच्या नवीन वाणाची लागवड करून गणपतराव घुमरे यांनी तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
गणपतराव घुमरे यांच्याकडे पूर्वी द्राक्षाची (Grape Farm) बाग होती. परंतु द्राक्षाचे अनियमित उत्पादन... अस्मानी नाहीतर सुलतानी संकट... यामुळे कर्ज त्यांच्यावरती वाढत गेले. कर्जाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नवीन द्राक्षाची बाग तोडली. आणि बँकेचे कर्ज काढून २८ गुंठे पॉलिहाउस उभे केले. त्यात गुलाबाची लागवड (Rose Cultivation) केली. कर्ज काढून उभे केलेल्या पॉलिहाउसमध्ये सुरवातीला शिमला मिरची आणि नंतर गुलाबाचे विक्रमी उत्पादन घेतले. यातूनच घुमरे यांनी पॉलिहाउसचे सर्व कर्ज फेडले. आजही त्यांची शेती नफ्यात आहे.
दरम्यान गुलाबाची बाग काढल्यानंतर पुढील परत लागवडीच्या दरम्यान पीक बदलासाठी काय करायचे? हा विचार ते करत असताना, त्यांनी अभ्यास करून काकडीच्या दोन वाणांची लागवड पॉलिहाऊसमध्ये केली. विशेष म्हणजे या पिकासाठी देखील योग्य व्यवस्थापन करत काकडीची शेती यशस्वी करून दाखवली आहे. सध्या या शेतीतून ते 70 ते 100 कॅरेट काकडीचे उत्पादन दिवसाआड घेत आहेत. तर काकडीला अपेक्षित भावही असल्याने उत्पन्नही चांगले मिळत आहे.
अप्रतिम शेती..
२०१६ मध्ये मी द्राक्ष बाग तोडून २५ लाखांचे कर्ज घेऊन पॉलिहाउस तयार केले. सुरुवातीच्या काळात सिमला मिरचीची लागवड केली. नंतर गुलाबाची लागवड केली. पहिली बाग काढल्यानंतर काही दिवस जमिनीत पीक बदलावे लागते. म्हणून काकडी या पिकाची मी लागवड केली. आधुनिक पद्धतीने त्याच्याकडे लक्ष दिले. त्यामुळे अतिशय सुंदर व विक्रमी उत्पादन देणारी काकडीची बाग तयार झाली आहे.
- गणपत मधुकर घुमरे शिवनई, ता. दिंडोरी