नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुसनद शिवरात यंदा उन्हाळी हंगामात सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकापासून पाहिजे तसे उत्पन्न मिळाले नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता या परिसरात सूर्यफूल लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असून, शेतकरी सूर्यफूल लागवडीकडे वळत आहेत.
सूर्यफुल हे एक बहुगुणी, कमी कालावधीत येणारे पीक आहे, याचबरोबर कोणत्याही हंगामात हे पीक घेता येत असल्याने कोणत्याही ठिकाणी या पिकाची उगवण क्षमचा चांगली असणार आहे. कमी पाण्यात तयार होणारे असे अत्यंत उपयुक्त पीक आहे. या पिकाचे रब्बी हंगामात अपेक्षित उत्पादन मिळवायचे पेरणी, आणि बिजप्रक्रिया व्यवस्थित होणे गरजेचे ठरणार आहे. सद्यस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेवर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची डिसेंबर, जानेवारी महिन्यात लागवड केली आहे. सध्या हे पीक बहरात आले आहे.
खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामातील वातावरण सूर्यफूल पिकासाठी अत्यंत पोषक व लाभदायक असते म्हणून शेतकरी उन्हाळी हंगामात सूर्यफूल लागवडीला प्राधान्य देतात, सूर्यफूल पिकाचा कालावधी साधारणतः तीन ते चार महिन्यांचा असतो. सूर्यफुल हे सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास घेतले जाते. सूर्यफुलापासून चांगले उत्पन्न मिळावे यासाठी पुसनद येथील शेतकऱ्यांनी सुधारित आणि संकरित वाणाचा वापर केला आहे.
सूर्यफूल लागवडीच्या क्षेत्रात वाढ
जानेवारी महिन्यात लागवड केलेले पीक तीन महिन्यांचे झाले असून, झाडावर बहरलेल्या अवस्थेत फुले पाहावयास मिळत आहेत. सूर्यफुलाच्या बियांचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. तसेच बाजारात खाद्यतेलाचे वाढलेले भाव पाहता तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असून, शेतकरी सूर्यफूल लागवडीकडे वळत आहेत.