गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गत दोन दिवसांपासून थंडगार वाऱ्याने चांगलीच हुडहुडी भरली आहे. अशातच आज नाशिक आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक निचांकी तापमानाचीनाशिकमध्ये करण्यात आली आहे. नाशिक शहर 8.6 अंश तर निफाड 4.4 अंश सेल्सिअसवर येऊन ठेपले आहे.
जानेवारीचा शेवटचा आठवडा सुरु असून या आठवड्याच्या सुरवातीलाच थंडीने चांगलीच हुडहुडी भरवली आहे. नाशिकमध्ये रविवारी 12 अंशावर असलेले तापमान आज थेट खाली घसरले. राज्यात सर्वाधिक थंड शहर म्हणून आज नाशिकची नोंद झाली. नाशिकमध्ये केवळ 8.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडच्या गहू संशोधन केंद्रात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद झाली. अवघे 4.4 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. त्यामुळे नाशिकसह जिल्ह्यात सर्वाधिक थंडी असल्याचे जाणवले.
राज्यात थंडीचे अवघे काही दिवस शिल्लक असताना तापमानात घसरण होऊ लागली आहे. मागील आठवड्यापासून सकाळच्या सुमारास गार वारे वाहू लागले आहेत. दिवसभर उन्हात उभे राहिले तरी गार वाऱ्यामुळे थंडी जाणवत आहे. राज्यात बुधवारी नाशिक, पुणे, जळगावसह नगरचे तापमानही सर्वात थंड होते. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने रब्बी पिकांना चांगलाच फायदा होत आहे. जानेवारी महिन्यात पडलेल्या थंडीमुळे गहू, हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून पठार भागाकडे थंड वारे वाहत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे आणखी तीन-चार दिवसाची थंडी कायम राहण्याची शक्यता आहे तसेच नाशिकचा पारा देखील खाली येण्याची शक्यता सांगण्यात येत आहे.
अशी आहे थंडी
मागील काही दिवसांचा थंडीचा आलेख पाहिला असता नाशिकमध्ये रविवारी तापमान 12 अंश होते, तर निफाडमध्ये 9.0 अंश सेल्सिअस, अनुक्रमे सोमवारी 11.6 तर 8.8 अंश, मंगळवारी 10.1 अंश तर 6.4 अंश, बुधवारी 9.0 तर 5.6 तर गुरुवारी म्हणजेच आज 8.6 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 4.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत प्रचंड थंडी जाणवत असून दोन दिवसांपासून सकाळी बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. तर दुसरीकडे अचानक थंडी वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.