Nashik : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज, पडलेला पाऊस, वाऱ्याचा वेग, कमाल किमान तापमान आदीबाबत अचूक माहिती देण्याचे काम हवामान वेधशाळा करत असते. विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी (Igatpuri) यांच्या माध्यमातून ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र याचबाबत काम करते. गेल्या अनेक वर्षांपासून अखंडित सेवा दिली जात आहे. नेमकं हे ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र कसं काम करतं ते पाहुयात...
महाराष्ट्रातील अनेक भागात कृषी संशोधन केंद्र (Rural Agriculture Weather) कार्यरत आहेत. या कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी सल्ला, मार्गदर्शन आदींबाबत अवगत केले जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत इगतपुरी येथील कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. याच संशोधन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र कार्यरत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या सहकार्याने देशातील शेतकरी समुदायाला थेट सेवा प्रदान करणे, पिकांवर होणारा प्रतिकूल हवामानाचा प्रभाव कमी करणे आणि कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी अनुकूल हवामानाचा वापर करणे या उद्देशाने स्थापना करण्यात आली.
गेल्या काही वर्षापासून मान्सून उशिरा येत असून, कधी खूप जास्त पाऊस तर कधी कोरडा खंड पडत आहे. पाऊस लवकर किंवा उशिरा येतो, कमी किंवा जास्त होतो, त्यानुसार शेतकरी लवकर किंवा उशिरा पेरणी करतात. आपल्याला उपलब्ध असलेल्या हवामानाव्यतिरिक्त जमीन व पाणी साठ्याचा सक्षम उपयोग व प्रतिकूल हवामानाचा परिणाम कमी करून अनुकूल हवामानाचा फायदा उठविण्यासाठी कृषी हवामान संबंधी विशेष सल्ला सेवेचा लाभ घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषि हवामान प्रक्षेत्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी ह्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप्स, रेडिओ, मासिके आणि वर्तमानपत्रे इ. माध्यमद्वारे वेळोवेळी प्रसारित केलेल्या कृषी सल्ला पत्रिका देण्यात येते.
मेघदूत अँप चं काम
नाशिक जिल्ह्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना वेळेवर हवामानविषयक सूचना देण्यासाठी ‘मेघदूत’ हे स्मार्टफोन अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने शेतकरी तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा आणि पाऊस यासंबंधी माहिती मिळवू शकतात. या मधील माहितीच्या आधारे पुढील पाच दिवस पिकाचे नियोजन करता येऊ शकते. अॅप वापरणार्याला हवामान खात्याने दिलेल्या वातावरणाचा अंदाज याची हि माहिती मिळू शकते. अॅपवर त्यांच्या मोबाईल नंबरसह नोंदणी करून कोणीही या विषयाची माहिती मिळवू शकतो. एकूणच हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट साठी दामिनी मोबाईल अॅपचा करण्याचे आवाहन केले जाते.
ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्र हे शेतकऱ्यांसाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कृषी सल्ला, हवामान सल्ला, पीकनिहाय सल्ला दिला जातो. तसेच प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी हवामान खात्याने प्रकाशित केलेल्या हवामान बुलेटिन ची माहिती हि या अॅप्लिकेशन मिळेल. हवामान खात्याचा कृषी सल्ला पाठवण्यासाठी मोबाईल मेसेज आणि ईमेलला मर्यादा येतात. मोबाईल मेसेजच्या स्मार्टफोन अॅप्लिकेशन प्रयोगासह आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. पाच दिवसांचा अंदाज त्यांना पाणी देण्याची आणि पिकांची कापणी यासारख्या पीकनिहाय सल्ल्याची माहिती दिली जाते.
- जी.एन. फुलपगारे, संशोधन सहयोगी, ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र