विकास शहा
चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांच्या उघडीपनंतर सलग दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणात ११.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये ४.४७ टीएमसी उपयुक्त साठा आहे.
धरणातून ६७५ क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ३३०० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात पाथरपुंज येथे १०७, निवळे येथे ७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पाथरपुंज येथे आजअखेर १ हजार ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी चांदोली (ता. शिराळा, सांगली) येथे कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्यापासून या धरणातून मागणीनुसार नदीपात्रात व कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येत होते. दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी तालुक्यात लहान मोठ्या सरी पडल्या. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
सकाळी अतिवृष्टी, दुपारनंतर उघडीप
चांदोली धरण परिसरात १ जूनपासून ४१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच, शनिवारी सकाळी पाथरपुंज (७९ मिमी.) व निवळे (७८ मिमी) या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. दुपारी पाथरपुंज (२८ मिमी), निवळे (३८ मिमी), चांदोली धरण (२० मिमी) व धनगरवाडा (११ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारपर्यंत नोंदला गेलेला पाऊस परिसराचे नाव : आजचा पाऊस कंसात
एकूण पाऊस (मिमी)
• चांदोली धरण ३७ (४१५)
• पाथरपुंज १०७ (१०८१)
• निवळे ८७ (८१७)
• धनगरवाडा ४१ (४३७)
जूनमध्ये पाथरपुंजला अतिवृष्टी (मिमी)
११ जून - ६९
२१ जून - १३३
२३ जून - १७६
२६ जून - ८६
२९ जून - १०७