राज्यात नुकतीच मान्सूनला सुरुवात झाली असली तरी पावसानं अनेक ठिकाणी ओढ दिल्याचे दिसत आहे. मराठवाडा विभागात ९२० धरणांमध्ये ९.३४ टक्के पाणीसाठा राहिला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दि १५ जून राेजी ६७८.३९ दलघमी जलसाठा शिल्लक राहिला आहे.
राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. नाशिक, नगरसह पुण्यातील धरणांमधील पाणी वाढत असून मराठवाडा विभागात २३.९५ टिएमसी पाणी राहिले आहे.
मराठवाड्यात उन्हाची रखरख आता कमी झाली आहे. धरणांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात ५.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीत ३१.५६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
हिंगाेलीतील सिद्धेश्वर धरणात अजूनही शुन्य टक्के जलसाठा राहिला आहे. येलदरी धरणात २७ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून या जिल्ह्यांमधील धरणप्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे.