संजय लव्हाडे
सोमवारी पोळा आणि शनिवारी श्री गणेशाचे आगमन यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांची लगबग जालनाबाजारात वाढली आहे. गहू आणि सोयाबीन तसेच खाद्यतेलाचे दर सध्या तेजीत असून बाजरी, हरभरा, मूग तसेच सोने-चांदीचे दर घटले आहेत. सोयाबीन आणि मुगाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने त्याचा विक्रीवर परिणाम झाला आहे. नवीन उडीद बाजारात आला आहे.
सोमवारी पोळा असल्याने बाजारात साहित्य खरेदीसाठी शुक्रवारपासून गर्दी झाली. बैलांना सजविण्याच्या साहित्याच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. मातीच्या रंगीबेरंगी बैलांची विक्रीदेखील जोरात सुरू असून त्यातही १५ ते २० टक्के भाववाढ झाली.
ऐन सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेलांचे दर वाढण्याचे संकेत आहेत. कारण, खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सध्या पामतेल १०५००, सूर्यफूल तेल १०८००, सरकी तेल १०७००, सोयाबीन तेल १०६०० आणि करडी तेलाचे दर १९००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच आहे. किमती एवढ्या कमी झाल्या आहेत की खर्चाचा हिशेब करणेही कठीण झाले आहे, तेलबिया आणि कडधान्य या दोन्ही पिकांमध्ये सोयाबीनची गणना केली जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन मोठी उत्पादक राज्ये आहेत आणि या दोन्ही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना एमएसपीएवढाही भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
मागील २-३ दिवसांत सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांना तेवढाच दिलासा मिळाला. जालना बाजारपेठेत सध्या सोयाबीनची आवक ११०० पोत्यांची असून भाव ३९०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. येत्या काळात सण असल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
हरभऱ्याचे उत्पादन घटले
• हरभन्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली तेजी आली. सध्या हरभऱ्याला चांगली मागणी असून भाव प्रतिक्विंटल ५८०० ते ७५०० रुपये असे आहेत.
• बाजारातील आवक सध्या फक्त ६० पोती इतकीच आहे. सणांमुळे हरभऱ्याची तेजी पुढील काही महिने अशीच राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. तुरीच्या दरात मागील महिनाभरात जवळपास ३०० रुपयांची मंदी आली.
• सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तुरीला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. जालना बाजारपेठेत तुरीची आवक २० पोती इतकी असून भाव ६००० ते १०४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
बाजारपेठेत ४०० पोत्यांची आवक
• मुगाला हमीभाव ८ हजार ५५८ रुपये असताना सध्या चांगल्या दर्जाच्या मुगाला ७३०० ते ९१००। तर साधारण गुणवत्तेच्या मुगाला ६००० ते ७००० रुपये इतका भाव मिळताना दिसत आहे. जालना बाजारपेठेत मुगाची आवक ४०० पोती इतकी आहे.
• जालना बाजारपेठेत नवीन उडदाची आवक सुरू झाली असून दररोज ३० पोती बाजारात येत आहेत. केंद्र शासनाकडून सप्टेंबर महिन्यासाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी साखरेचा २३.५ लाख मेट्रिक टन इतका कोटा जाहीर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये २५ लाख मेट्रिक टन कोटा जाहीर करण्यात आला होता. यामुळे साखरेचे दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे. सध्या साखरेचे दर ३९०० ते ४१०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.