संजय लव्हाडे
जालनाबाजारपेठेत सरकी व सरकी ढेपच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ज्वारी, मका, हरभऱ्यासह सोने चांदीमध्ये तेजी निर्माण झाली आहे. त्याचवेळी तूर व सोयाबीनमध्ये मात्र मंदीचे वातावरण आहे. राखी पौर्णिमा सणामुळे बाजारपेठेत रंगीबेरंगी राख्या दाखल झाल्या असून, महिलांची गर्दीही पाहायला मिळत आहे.
सरकी बाजारात नवा उच्चांक निर्माण झाला असून, साठवणूक कमी असल्याने बाजारपेठेत भाव प्रति क्विंटल ३०० रुपयांनी वाढले आहेत. सध्या सरकीचे भाव ३८५० रुपये प्रति क्विंटल आहेत. दुग्ध जनावरांसाठी लागणारी सरकी ढेप उत्पादन व स्टॉक कमी असल्याने तसेच नवीन कापसाचे उत्पादन येण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सरकी ढेपच्या भावात मोठी तेजी आली आहे. सध्या सरकी ढेपचा भाव ३८५० ते ३९०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊन
पोहोचला आहे. या वर्षातील नवीन मूग गत आठवड्यापासून बाजारात दाखल झाला असला, तरी आवक मात्र त्या प्रमाणात नसल्याचे चित्र आहे. मुगाला भाव मात्र चांगला आहे. जालना बाजारपेठेत मुगाची आवक केवळ ८ पोत्यांची होती. मुगाचे भाव ८००० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल आहेत.
राखी पौर्णिमेचा सण असल्याने बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजली आहे. बाजारात ब्रेसलेट स्वरूपातील राख्या आल्या आहेत. हुबेहूब सोन्याच्या ब्रेसलेटसारख्या दिसणाऱ्या या राख्यांची तरुणाईकडून खरेदी केली जात आहे. सणानिमित्त राखी व एरव्ही वर्षभर ब्रेसलेट म्हणून त्याचा वापर केला जातो.
बच्चे कंपनीसाठी विविध प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेतच. जालना बाजारपेठेत १० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या राख्या पाहायला मिळाल्या. गतवर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी राख्यांचे भाव वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बाजारभाव
गहू | २५७५ ते ३००० रुपये प्रति क्चिटल |
ज्वारी | २००० ते ३७०० रुपये प्रति क्विंटल |
बाजरी | २१०० ते २६०० रुपये प्रति क्विंटल |
मका | २५७५ ते २७०० रुपये प्रति क्विंटल |
तूर | ८००० ते १०६०० रुपये प्रति क्चिटल |
हरभरा | ५५०० ते ७५०० रुपये प्रति क्चिटल |
सोयाबीन | ३४०० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल |
मूग | ८००० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल |
गूळ | ३६२५ ते ४५०० रुपये प्रति क्विंटल |
साखर | ३९०० ते ४०५० रुपये प्रति क्विंटल |
सोने-चांदीच्या दरामध्ये तेजी
• रक्षाबंधन सणापूर्वीच सोने आणि चांदी महागले आहे. कोणताही सण येण्यापूर्वी मौल्यवान धातूंत वाढ होत असल्याचे दिसते. सणासुदीच्या दिवशी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह असतो.
• ग्राहक थोडे जास्त पैसे गेले तरी काळजी करत नाहीत, तर काही जण बाजाराचा अंदाज घेऊन खरेदी करतात. काही ग्राहक सणासुदीपूर्वीच खरेदी करतात. ग्राहकांच्या खरेदी मूडवर बाजारपेठेला फायदा होतो.
• या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली आहे. या आठवड्यात चांदी ४ हजार रुपयांनी महागली तर सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. सोने ७२ हजार २०० रुपये प्रति तोळा तर चांदी ८५ हजार रुपये प्रति किलो आहे.