सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत सैनिकी परंपरा जपणाऱ्या अपशिंगे मिलिटरी गावाने जिल्ह्यातच नव्हे तर देशात आपले नाव कोरले आहे. आजही गावातील घरटी एक जण सैन्यदलात आहे तर गेल्या वर्षभरात १८ जण 'अग्निवीर' म्हणून सेवा बजावत आहेत.
गावातील अनेक युवकांना लहानपणापासून सैनिकी बाळकडू मिळाल्याने सैन्यात जाण्यासाठी कसून तयारी करत आहेत. अपशिंगे मिलिटरी गावाने शेकडो सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी देऊन हे 'शूरांचे गाव' बिरूद सार्थ ठरवले आहे.
या गावातील २७५ वीरांनी पहिल्या महायुद्धात पराक्रमाची शर्थ केली. यापैकी ४६ जवानांना वीरमरण आले. याशिवाय सुभाषचंद्र बोस यांच्या 'आझाद हिंद सेने'तही गावातील चार जवान सामील झाले होते.
१९६२ मध्ये चीन युद्धात गावातील ४ जवान शहीद झाले. १९६५ मध्ये पाकिस्तानविरोधात झालेल्या युद्धात गावातील २ जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यानंतर पुन्हा १९७१ मध्ये बांगला युद्धात एक जवान शहीद झाला. या शूर सैनिकांपासून प्रेरणा घेत गावातील सर्व तरुण सैन्यदलात भरती होण्याची तयारी करत असतात.
घरातील एक तरी व्यक्ती सैन्यदलात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गावाला सैनिकी परंपरा आहे. देशासाठी गावातील अनेक सुपुत्रांनी सीमेवर आपले रक्त सांडले आहे. या त्यागातून गावाला देशसेवेची प्रेरणा मिळत आहे. गावात अनेक आजी-माजी सैनिक आहेत. माजी सैनिकांकडून युवकांना सैन्यभरतीबाबत मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे गावातील प्रत्येक घरात किमान एक तरी व्यक्त्ती हमखास सैन्यात आहे.
ब्रिटिशांना घ्यावी लागली पराक्रमाची दखल
अपशिंगे या गावाच 'अपशिंगे मिलिटरी' असे नामकरण करण्यामागे पहिल्या महायुद्धाचा इतिहास आहे. १९१४ ते १९१९ या काळात गावातील तब्बल ४६ जणांना वीरमरण आले. याची दखल तत्कालीन ब्रिटिश सरकारलाही घ्यावी लागली. ब्रिटिश सरकारने या गावाला 'अपशिंगे मिलिटरी' असे नामकरण करून पराक्रमाचा गौरव केला.
१९६२ च्या युद्धात चार जण शहीद
• १९६२ मध्ये चीन युद्धात गावातील चार जण शहीद झाले. इमाम मोहम्मद शेख, प्रल्हाद तुकाराम निकम, एकनाथ सखाराम निकम, दिनकर यशवंत निकम हे शहीद झाले.
• तसेच १९६५ भारत-पाक युद्धात शंकर जोती निकम, विष्णू सीताराम निकम शहीद झाले. बांगला युद्धात दिनकर भैरू पवार यांनी प्राणांची आहुती दिली