भाताचे अगार म्हणून ओळख असलेल्या महुडे व वेळवंड भागात भात कापणी जोरात सुरू असली तरी भात मळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना शेतकरी दिसत आहेत. तर, पारंपरिक पद्धतीने भात मळणीसाठी बैलांच्या वापराची खळी नामशेष झालेली दिसत आहे.
भोर तालुक्यातील ग्रामीण भागात भात कापणी जोरदार चालू आहे. शेतकरी मात्र शेतात किंवा शेताच्या बाजूला मोकळ्या जागेत भाताचे उढवे लावत आहेत. पण, पारंपरिक पद्धतीने भात मळणीसाठी लागणाऱ्या खळ्याचा वापर नामशेष होताना दिसत आहे. खळ्यामध्ये सुरुवातीला भात झोडून वेगळे केले जाते. भात झोडून झाल्यावर असणारा भाताचा पेंढा खळ्यात अंथरला जातो व त्यावर तिवढ्याला बैल बांधून फिरवले जातात त्याला भाताचा पेंढा मळून घेतला जातो तो भाताचा पेंढा जनावरांसाठी उपयोगात आणला जातो. पण आता तसे काही उरले नाही.
वेळेची होतेय बचत
शेतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेची बचत, पैशांची बचत होते. व शारीरिक त्रास कमी होतो. त्यामुळे शेतकरी हा पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक शेतीकडे वाटचाल करताना दिसत आहे, असे मत हभप बी.डी. गायकवाड यांनी व्यक्त केले.
दरवाढीमुळे व्यवसाय अडचणीत
डिझेलचे दर गगनाला भिडत चालले आहेत त्यामुळे भात मळणीचे दर वाढवावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी पोत्याचे दर वाढविल्यामुळे नाराज आहेत. अशात धंदा करणे अवघड होत आहे, असे मत भात मळणी व्यावसायिक गणेश बांदल यांनी व्यक्त केले.
गजबज झाली कमी
शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता भात काढणीपासून ते मळणीपर्यंत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पारंपरिक खळी लोप पावत चालली आहेत. भात काढणीला सुरुवात झाल्यानंतर भल्या पहाटे मळणी करण्यासाठी शेतात गजबज दिसायची. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पारंपरिक खळी न काढल्याने शेतातील गजबज दिसत नाही. शेतीच्या कामात खेळीमेळीचे वातावरण दिसायचे ते सध्या दिसत नाही. पारंपरिक खळी व शेती तसेच जुने भाताचे वाण पाहावयास मिळत नाही.