नागपूर : राज्य सरकारने फेब्रुवारी २०२३ मध्ये अंदाजपत्रकीय अधिवेशनात ‘संत्रा निर्यात सुविधा केंद्राची’ घाेषणा केली. ८ नाेव्हेंबर २०२३ मध्ये या घाेषणेत ‘आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र’ असा बदल केला. याबाबत २७ डिसेंबर २०२३ राेजी अध्यादेश जारी केला. यात नमूद केलेल्या बाबी विचारात घेता राज्य सरकारने निर्यात सुविधा केंद्राला प्रक्रिया केंद्र संबाेधले आहे.
राज्य सरकारने नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटाेल व कळमेश्वर, माेर्शी, जिल्हा अमरावती आणि संग्रामपूर, जिल्हा बुलडाणा या पाच ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पाचही केंद्रांच्या उभारणीचा प्रस्तावित खर्च ३९.९० काेटी रुपये असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी या पाचही केंद्रांसाठी एकूण २० काेटी रुपये मंजूर करण्याची घाेषणा सरकारने केली हाेती.
या केंद्रांमधून संत्र्याचे ग्रेडिंग व वॅक्सिंग करून त्याचे ‘सेल्फ लाइफ’ वाढविले जाणार आहे. यात ‘रेडी टू सर्व्ह’ ही सुविधा असल्याने या केंद्रात संत्र्यावर कुठलीही प्रक्रिया केली जाणार नाही. उलट, संत्रा ‘टेबल फ्रूट’ म्हणून बाजारात आणला जाणार आहे. हे सर्व केंद्र सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी), शेतकरी गट, कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी उद्याेजक यांना उभारायचे आहे. यात प्रकल्प केंद्राची १५ टक्के रक्कम लाभार्थ्यांची असून, ८५ टक्के रक्कम बँकेकडून कर्ज रूपाने घ्यायची आहे. यासाठी सरकार लाभार्थ्यांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. त्यामुळे प्रकल्प केंद्र राज्य सरकारऐवजी लाभार्थी उभारणार आहेत.
साेललेल्या संत्राचे करणार काय?
या केंद्रांमध्ये पॅक हाऊस, प्री कुलिंग, शीतगृह, ग्रेडिंग, वॅक्सिंग, आरटीएस (रेडी टू सर्व्ह) आदी सुविधा निर्माण केल्या जाणार असून, संत्र्याच्या सालीपासून ‘काेल्डप्रेस’ पद्धतीने ‘ऑइल’ काढणार असल्याचे या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. मात्र, साेललेल्या संत्राचे पुढे काय करणार याबाबत सरकारने काहीही स्पष्ट केले नाही. याचा खुलासा करणे गरजेचे आहे.
प्रक्रिया केंद्र आणि प्रस्तावित किंमत
- नागपूर - ५.१० काेटी रुपये
- काटाेल - ५.९० काेटी रुपये
- कळमेश्वर - ५.१० काेटी रुपये
- माेर्शी - १४.७० काेटी रुपये
- संग्रामपूर - ९.१० काेटी रुपये
राज्य सरकारने आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र स्वत: उभारायला हवे. ते एफपीसी किंवा संस्था अथवा खासगी उद्याेजकांना चालवायला द्यावे. यातून संत्रा उत्पादकांना फायदा हाेईल. शिवाय, कंपन्यांनाही संत्रा विक्री करणे साेयीचे हाेईल.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.