कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पावसाचा धडाका सुरूच राहिला. एकीकडे पंचगंगा नदी कोल्हापूरजवळून धोक्याच्या पातळीवरून वाहत असताना राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडल्याने महापुराचा धोका आणखी वाढला.
त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज, शुक्रवारी आणि उद्या, शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रणात आणण्यासाठी राजकीय हालचालीही सुरू झाल्या आहेत.
गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरूच होता. सकाळी काही मिनिटांसाठी दोन, तीन वेळा ऊन पडल्याने दिलासा मिळेल असे वाटत होते; परंतु, संध्याकाळपर्यंत संततधार सुरू राहिली आणि साहजिकच धरणक्षेत्रातही मोठा पाऊस असल्याने सर्वच धरणे आणि लघुपाटबंधारे प्रकल्पातून विसर्ग सुरू होत आहे.
राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडल्याने एकूण १० हजार क्युसेक पाणी विसर्ग भाेगावती नदीत सुरू झाला. नदीकाठच्या गावांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील बालिंगे गावाजवळील दगडी कमानीचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला असून, आंबामार्गे रत्नागिरीला जाणारा रस्ता बंद असतानाच आता कोकणात गगनबावडामार्गे जाणारा दुसरा मार्गही गुरुवारी बंद झाला.
पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट असून दुपारी तीन वाजता ही पातळी ४३.०३ फुटांवर होती. जिल्ह्यातील ८४ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन अलमट्टीतून अधिक विसर्ग करावा, अशी मागणी केली आहे.
तर आमदार सतेज पाटील यांनी बंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन अलमट्टीतून अधिकाधिक विसर्ग करून कोल्हापूर, सांगलीतील पूरनियंत्रणाला सहकार्य करण्याची विनंती केली.
त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर शहरासह आंबेवाडी, चिखलीसह अन्य काही गावांतील ग्रामस्थांचे आणि जनावरांचे स्थलांतर करण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
राधानगरी धरण एकूण सहा दरवाजे खुले (३,४,५,६,७,१)
पाण्याचा विसर्ग
विद्युत : १५०० विसर्ग
दरवाजे : ८५६८ विसर्ग
एकूण : १००६८ विसर्ग
हे रस्ते झाले बंद
१) पन्हाळा रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद.
२) बालिंगा पुलावरून वाहतूक बंद केल्याने गगनबावडा मार्ग बंद.
३) मडिलगे बुद्रुकजवळ रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर गारगोटी मार्ग बंद.
४) जिल्ह्यातील ११ राज्यमार्ग आणि २९ जिल्हा मार्ग बंद.
५) जिल्हा परिषदेकडील ३८ रस्ते बंद, पर्यायी मार्गावरून वाहतूक.