ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत आता स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. स्कायमेटच्या महावेध प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळांतील ४३ पैकी ३० गावांमध्ये आता हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे यापुढे गावात पाऊस पडेल का; हे हवामान तज्ज्ञ नव्हे तर गावचे सरपंच सांगणार असल्याची एकच चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कधी जास्त पाऊस पडतो, तर कधी कमी. तो नेमका कधी पडणार, किती पडणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आता गावखेड्यातील शेतकऱ्यांना, मजुरांना सरपंचांकडून मिळणार आहेत. त्यासाठी जिल्हाभरातील ३० गावांमध्ये हवामान केंद्र सुरू असून उर्वरित १३ महसुली गावांमध्ये लवकरच या केंद्रांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
किती गावांत होणार हवामान केंद्र
ठाणे जिल्ह्यात ४३ महसूल मंडळांपैकी ३० महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र सध्या अस्तित्वात आहे. उर्वरित १३ महसूल मंडळांमध्ये हवामान केंद्रासाठी जागा निश्चिती करण्याची कार्यवाही चालू आहे.
गावात कळणार हवामानाचा अंदाज
आता गावातल्या गावातच तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान घटकांची आकडेवारी उपलब्ध होणार आहे.
काय आहे महावेध प्रकल्प ?
महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र प्रत्येक महसूल मंडळामध्ये उभारणी करून त्याद्वारे हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त केला जाणार आहे. यासाठी कृषि विभागाने सार्वजनिक खासगी भागीदारीतून बीओओ तत्त्वावर एका खासगी कंपनीची महावेध प्रकल्पासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुका : ४३ गावांत हवामान केंद्र
महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे प्राप्त होणारी हवामानविषयक आकडेवारी, हवामानावर आधारित पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती इत्यादी बाबींकरिता महत्त्वाची आहे.
- कृषी विभाग, ठाणे