करमाळा : करमाळा व परंडा तालुक्याच्या सीमेवर असलेला सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील आवाटी, हिवरे, निमगाव ह., कोळगाव, मिरगव्हाण, बालेवाडी, हिसरे, गौंडरे, नेरले, सालसे या ९ गावांतील २०,४१५.२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले आहे.
ज्यामुळे सीना कोळेगाव प्रकल्पाचे ७ दरवाजे उघडले असून २२१२ क्यूसेकने सिना नदीत विसर्ग सुरू झाला आहे. सीना कोळगाव धरण शंभर टक्के भरल्याने पूर्व भागातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे खैरी व नळी या दोन नद्यांनाही पूर आला आहे.
खैरी नदीवर असलेल्या जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील खैरी धरण काठोकाठ भरल्याने पुढे ते पाणी करमाळा तालुक्यातील पांढरेवाडी प्रकल्पात येते. काही दिवसांपूर्वी पांढरेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने ते पाणी थेट सीना कोळगाव प्रकल्पात येत आहे. दुसरीकडे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे.
मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत असताना प्रकल्पातील पाणी आनाळा साठवण तलावात सोडण्यात आले. सीना कोळेगाव प्रकल्पाचे दोन दरवाजे पाच सेंटिमीटरने उचलण्यात आले.
आमच्याशी व्हॉटसअप्पद्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा.