Smart Project :
अमरावती :
कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ३७ शेतकरी कंपनीचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत २३ कंपनी स्थापन करण्यात आल्या, याबाबत डीपीआर मंजूर आहेत. यापैकी १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारा संत्रावर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहे.
या प्रकल्पात ६० टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान देय असल्याने मूल्य साखळीचा विकास करून शेतकऱ्यांना उन्नती साधता येणार आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाद्वारा जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत ३७ शेतकरी कंपनीचे लक्षांक आहे.
त्यातुलनेत २३ शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रकल्प आराखड्यास मंजुरी मिळालेली आहे. प्रत्यक्षात १५ कंपन्यांचे काम सुरू झालेले आहे. त्यापैकी १० कंपनीचे काम पूर्ण झालेले आहे.
आसेगाव पूर्णा व चांदूर रेल्वे येथील शेतकरी कंपनीद्वारा दोन हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना तारण कर्ज मिळण्याची सुविधा झाल्याचे या प्रकल्पाचे नोडल अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पाचे शेतकऱ्यांची उन्नती हेच उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
१२ शेतकरी कंपन्यांचे संत्रावर प्रक्रियासाठी प्रस्ताव या प्रकल्पांतर्गत १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारा संत्रा फळावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरवर संत्राचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे संत्र्याचे क्लिनिंग, ग्रेडिंग व वॅक्सिंग या प्रकारे प्राथमिक प्रक्रिया करण्याचे काम सध्या प्रगतीत आहे.
या प्रकल्पांतर्गत संत्र्यावर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी २ कोटी व फळपिकांवर प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी ३ कोटी रुपये ६० टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान देय असल्याची माहिती या प्रकल्पाचे उपसंचालकांनी दिली.
'स्मार्ट' प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ३७ शेतकरी कंपन्यांचे लक्ष्यांक आहे. १५ प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. याद्वारे कृषिमूल्य साखळीचा विकास होऊन शेतकरी कंपनी कृषी उद्योजक बनणार आहेत. -उज्चल आगरकर, नोडल अधिकारी