चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील शेतशिवारात शेतपिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने मानव वन्य जीव संघर्ष टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी वन विभागाकडून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन वाटप करण्यात येत आहे.
सोलर फेन्सिंगमुळे वन्य प्राण्यांकडून होणारे पीक नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. जंगलालगत शेती असणाऱ्या १ हजार ९६७ शेतकऱ्यांना वन विभागातर्फे झटका मशीन देण्यात आली आहे.
भटक्या व वन्य प्राण्यांपासून पिकांना धोका असतो. भटकी गुरे, गायी, नीलगाय, रानडुकर शेतात घुसून नासाडी करत असल्याने तालुक्यातील शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी झटका मशीन तयार केली आहे. ज्यामुळे जनावरांना इजा न होता पीक सुरक्षित ठेवता येईल. झटका मशीन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. ही मशीन चार्ज करण्यायोग्य आहे. त्याला पॉवर बॅटरी जोडलेली आहे.
मशीनच्या मागून दोन तारा बाहेर येतात, ज्या शेताच्या आजूबाजूला वायरला जोडलेल्या असतात. एका मशीनने २० ते २५ गुंठा पिकांचे संरक्षण करता येते. एखादा भटका प्राणी शेतात शिरला आणि शेतात लावलेल्या झटका मशीनच्या संपर्कात येताच, त्याला शॉक बसतो आणि लगेच शेतातून पळून जातो.
बल्लारपूर तालुक्यात ६ हजार ७३८ खातेदार आहेत. त्यापैकी १२७० खातेदारांनी ऑफलाईनद्वारे पैसे भरले व ६९७ खातेदारांनी ऑनलाईन तर अनेक शेतकरी स्वतः मशीन घेत आहेत. या योजनेचा फायदा महाबीटीवरून अर्ज करून घेता येतो. ही मशीन घेण्याकरिता शासन ७५ टक्के अनुदान देते तर २५ टक्के शेतकऱ्यांना भरावे लागते. मात्र अजून अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
झटका मशीनबाबत वनविभागाने तालुक्यातील गावात जनजागृती केली. शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंतर्गत महाडीबीटी या संकेतस्थळावर नाव नोंदणी व अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घेण्याकरिता मोफत कॅम्प घेण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचा कल झटका मशीन घेण्याकडे वाढला आहे. - नरेंद्र भोवरे, वन परिक्षेत्र अधिकारी, मध्य चांदा बल्लारशाह.