सातारा : मागील एक वर्षापासून सोयाबीनला भाव कमी आहे. Soybean Market साताराबाजार समितीत तर सोयाबीनला क्विंटलला साडे चार हजार रुपयांवर दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन घरात आणखी किती दिवस ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण, दर वाढतील, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निराशाच झाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. कारण, जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे सुमारे ३ लाख हेक्टर आहे. २०२२ मध्ये सोयाबीनचे ६८ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. पण, प्रत्यक्षात ८७ हजार हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले होते.
याला कारण म्हणजे सोयाबीनला चांगला भाव मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढला. तसेच २०२३ मध्येही ८५ हजार हेक्टरवर पेर झाली होती. पण, गेल्या वर्षी काढणीच्या वेळी दरात घसरण झाली. त्यातच अतिवृष्टीत सोयाबीनचे नुकसान झाले. यामुळे सोयाबीन काळे पडले. बाजारात काळ्या सोयाबीनला दर पाडून मागत होते. मात्र, शेतकऱ्यांनी दर वाढेपर्यंत वाट पाहिली.
जिल्ह्यात २०२२ मध्ये ऑक्टोबरनंतर सोयाबीनचा दर वाढला. साडेपाच हजारांवर गेला. पण, त्यानंतर दरात घसरण झाली. पाच हजारांच्या खाली भाव आला. तो वाढलाच नाही. गेले काही महिने सोयाबीनचा क्विंटलचा भाव पाच हजारांच्या आत आहे. त्यामुळे दराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. कारण, अजूनही शेतकऱ्यांनी चांगल्या दरासाठी सोयाबीन घरात ठेवले आहे.
गेल्यावर्षी ८५ हजार हेक्टर क्षेत्र
■ सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सोयाबीन क्षेत्रात वाढ होत गेली.
■ २०२२मध्ये खरीप हंगामात तब्बल ८७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. टक्केवारीत हे प्रमाण १२७ होते.
■ २०२३मध्ये कृषी विभागाने ७४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र निश्चित केले.
■ प्रत्यक्षात ८५ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.
तूर करते मालामाल; पण क्षेत्र कमी
बाजारपेठेत तुरीला चांगला दर मिळत आहे. विदर्भात क्विंटलला १० हजारांवर दर गेला होता. सातारा बाजार समितीत ६ ते ७ हजारांदरम्यान भाव येत आहे. यामुळे शेतकरी मालामाल होत आहे. पण, सातारा जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र अत्यल्प असते. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अवघ्या ९७५ हेक्टर क्षेत्रावर तूर होईल, असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात पेरणी ४५१ हेक्टरवर झाली होती.
सोयाबीनला मिळालेला दर प्रतिक्विंटल
महिना | वर्ष | दर |
जानेवारी | २०२३ | ५,२०० |
फेब्रुवारी | २०२३ | ५,१०० |
मार्च | २०२३ | ५,१०० |
एप्रिल | २०२३ | ५,१५० |
मे | २०२३ | ५,०५० |
जून | २०२३ | ४,९०० |
जुलै | २०२३ | ४,७०० |
ऑगस्ट | २०२३ | ४,८०० |
सप्टेंबर | २०२३ | ४,७०० |
ऑक्टोबर | २०२३ | ४,६०० |
नोव्हेंबर | २०२३ | ५,००० |
डिसेंबर | २०२३ | ४,८०० |
जानेवारी | २०२४ | ४,७०० |
फेब्रुवारी | २०२४ | ४,७०० |
मार्च | २०२४ | ४,६०० |
एप्रिल | २०२४ | ४,६०० |
मे | २०२४ | ४,६५० |
अधिक वाचा: Tur Variety महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरित वाण परभणी कृषी विद्यापीठाकडून विकसित