साेयाबीनच्या उत्पादनात वर्षागणिक घट हाेत असून, उत्पादन खर्च मात्र वाढत चालला आहे. यावर्षी साेयाबीनचे दर ‘एमएसपी’च्या आसपास घुटमळत असून, बाजारातील आवकही मंदावली आहे. सध्याचे दर विचारात घेता शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान दीड ते दाेन हजार रुपयांचा ताेटा सहन करावा लागत आहे.
राज्यात दरवर्षी सरासरी ४९ ते ५१ हजार हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी केली जाते. साेयाबीनची सर्वाधिक पेरणी छत्रपती संभाजीनगर विभागात केली जात असून, त्याखालाेखाल पुणे, नागपूर, लातूर आणि नाशिक विभागांत साेयाबीनची पेरणी केली जाते. प्रतिकूल हवामान, राेग व किडींचा प्रादुर्भाव यासह अन्य बाबींमुळे दरवर्षी साेयाबीनच्या उत्पादन खर्चात वाढ हाेत असून, प्रति एकर उत्पादकता व उत्पादन घटत चालले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले अधिक उत्पादन देणारे, तसेच राेग व किडींना प्रतिबंधक असलेले बियाणे उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.
साेयाबीनची ‘एमएसपी’
वर्ष - एमएसपी
२०१८-१९ - ३,३३०
२०१९-२० - ३,७१०
२०२०-२१ - ३,८८०
२०२१-२२ - ३,९५०
२०२२-२३ - ४,३००
२०२३-२४ - ४,६००
साेयाबीनचे सरासरी दर
वर्ष - दर
२०१८-१९ - ३,३५०
२०१९-२० - ३,४२०
२०२०-२१ - ४,१६६
२०२१-२२ - ५,४९१
२०२२-२३ - ४,९५०
२०२३-२४ - ४,९००
‘एमएसपी’, दर आणि उत्पादन खर्च
केंद्र सरकारने सन २०१८-१९ ते २०२३-२४ या सहा वर्षांत साेयाबीनच्या ‘एमएसपी’मध्ये प्रति क्विंटल १,२७० रुपयांची वाढ केली आहे. याच काळात साेयाबीनचे दर सरासरी प्रति क्विंटल १,५५० रुपयांनी वाढले आहेत. या काळात प्रत्येक कृषी निविष्ठेच्या दरात किमान १७ ते २२ टक्क्यांनी, तर मजुरीच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत साेयाबीनची ‘एमएसपी’ आणि दर वाढले नाहीत.
‘एमएसपी’पेक्षा ४० टक्के अधिक दर हवा
चालू हंगामात साेयाबीनचा उत्पादन खर्च प्रति १८ ते २० हजार रुपये आहे. एकरी उत्पादन सरासरी ३ ते ५ क्विंटल असून, सध्या साेयाबीनला मिळणारा दर विचारात घेत शेतकऱ्यांना साेयाबीन विकून फायदा हाेण्याऐवजी प्रति क्विंटल दीड ते दाेन हजार रुपयांचा ताेटा सहन करावा लागत आहे. साेयाबीन उत्पादकांना आधार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘एमएसपी’पेक्षा ४० टक्के अधिक दर देऊन म्हणजेच प्रति क्विंटल सात हजार रुपये दराने खरेदी करायला हवी.
साेयाबीनचे अर्थशास्त्र
मुळात साेयाबीन हे मानवी खाद्य नाही. त्यात तेलाचे प्रमाण केवळ १२ ते १३ टक्के असते. ढेपेचे दर वाढल्यास साेयाबीनचे दर वधारतात. सध्या जागतिक बाजारात साेयाबीन ढेपेचे दर ४०० डाॅलर म्हणजे ३,२०० रुपये प्रति टन असून, साेयाबीनचा दर १३ ते १३ डाॅलर प्रति बुशेल म्हणजेच ४ हजार रुपये प्रति क्विंटल आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले असून, आयात वाढविल्याने इतर तेलबियांसाेबतच साेयाबीनचेही दर दबावात आले आहेत. तेलबियांच्या वायद्यांवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने दरातील स्पर्धाही संपली आहे.