छत्रपती संभाजीनगर :
'ग्राम स्वच्छता अभियान' ही आता केवळ चळवळ राहिलेली नाही, तर ती सर्वांच्या अंगवळणी पडली आहे. आपले संपूर्ण गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण परिश्रम घेतो. हा पुरस्कार म्हणजे तुमच्यासाठी 'वर्ल्ड कप' आहे. मात्र, केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती आहे', असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (२३ सप्टेंबर) रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला.
या सोहळ्यात सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ अशा चार वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्याक विकास व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक डॉ. ई. रविंद्रन, अतिरिक्त संचालक शेखर रौंदळ, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदी उपस्थित होते.
यांना मिळाले पुरस्कार
या सोहळ्यात सन २०१८-१९ या वर्षातील गोंदिया जिल्ह्यातील शिरेगावबांध (ता. अर्जुनी (मोर)) या ग्रामपंचायतीने २५ लाखांचा प्रथम पुरस्कार, पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडी तर्फ चाकण (ता. खेड) ग्रामपंचायतीने २० लाखांचा द्वितीय पुरस्कार, तर नागपूर जिल्ह्यातील महालगाव (ता. कामठी) ग्रामपंचायतीने १५ लाखांचा तृतीय पुरस्कार पटकावला.
सन २०१९-२० वर्षातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापार्डे (ता. देवगड) ग्रामपंचायतीने ४० लाखांचा प्रथम, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार (ता. वेंगुर्ला) ग्रामपंचायतीने २५ लाखांचा द्वितीय आणि सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीला २० लाखांचा तृतीय पुरस्कार मिळाला.
सन २०१९-२० वर्षांसाठी बीड जिल्ह्यातील आवरगाव (ता. धारुर), हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव, नागपूर जिल्ह्यातील येनीकोणी (ता. नरखेड) या तिन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी २ लाखांचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन २०२०-२१ आणि २०२१-२२ एकत्रित स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार (ता. वेंगुर्ला) ग्रामपंचायतीने ४० लाखांचा प्रथम, सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता. कराड) ग्रामपंचायतीला २५ लाखांचा द्वितीय, तर भंडारा जिल्ह्यातील खैरी (वलमाड़ारी) आणि पुणे जिल्ह्यातील काळवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतींना २० लाखांचा तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला.
याशिवाय सन २०२०- २१ आणि २०२१-२२ एकत्रित विशेष पुरस्कारापोटी नांदेड जिल्ह्यातील हाडोळी (ता. भोकर), नागपूर जिल्ह्यातील खापरी (केणे) (ता. नरखेड) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरवडे (ता. सावंतवाडी) या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २ लाखांचा पुरस्कार देण्यात आला.