टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे खानापूर, सुहास बाबर आटपाडी आणि विसापूर मंडलातील उर्वरित वंचित ५४ गावांना टेंभूचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यानिमित्ताने विटा येथे दुपारी साडेबारा वाजता महात्मा गांधी विद्यामंदिरच्या प्रांगणात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.
दुष्काळी खानापूर, आटपाडी मतदारसंघात टेंभू योजनेच्या माध्यमातून जलक्रांती झाली आहे. या भागात टेंभूमुळे शेतकरी सुखावला. पण, मतदारसंघातील सर्वच गावांना टेंभूचे पाणी मिळत नव्हते.
दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी सर्वच गावांना टेंभूचे पाणी देण्यासाठी पाठपुरावा केला आणि टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्यास मंजुरी मिळवली. यामुळे आता खानापूर घाटमाथ्यासह मतदारसंघातील सर्वच गावे टेंभूच्या लाभक्षेत्रात येणार आहेत, असे बाबर यांनी सांगितले.
१८ हजार क्षेत्र ओलिताखाली
खानापूर तालुक्यातील पळशी गावातील तलावातून पळशी उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. पळशी तलाव टप्पा क्र. ५ च्या गोरेवाडी कालव्यातून स्वतंत्र फिडरने भरला जाणार आहे. कामथ वितरीकेतून आटपाडी तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पाणी दिले जाणार आहे. माण-खटाव वितरिकेतून आटपाडी पश्चिम भागातील गावांना पाणी मिळणार आहे. या माध्यमातून खानापूर तालुक्यातील २८, आटपाडी तालुक्यातील १४ व तासगाव तालुक्यातील १२ या वंचित गावांना पाणी मिळणार आहे, या माध्यमातून सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येत आहे असे बाबर यांनी सांगितले.
या गावांना मिळणार पाणी
• खानापूर तालुका
विटा, सुळेवाडी, गुंफा, गार्डी, भांबर्डे, वासुंबे, घाडगेवाडी, कुर्ली, पारे, बामणी, चिचणी, रेणावी, रेवणगाव, जाधववाडी, धोंडगेवाडी, ऐनवाडी, जखिणवाडी, गोरेवाडी, बलवडी (खा.), खानापूर, पोसेवाडी, घोटी बुद्रुक, घोटी खुर्द, भडकेवाडी, पळशी, बाणूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे.
• आटपाडी तालुका
विभूतवाडी, गुळेवाडी, पिंपरी बुद्रुक, आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी खुर्द, खांजोडवाडी, राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव, घरनिकी, कुरुंदवाडी.
• तासगाव तालुका (विसापूर मंडल)
पाडळी, धामणी, हातनोली, हातनूर, नरसेवाडी, कचरेवाडी, किंदरवाडी, धोंडेवाडी, विजयनगर, पेड, मोराळे व मांजर्डे आदी गावांचा समावेश आहे.