कृष्णा नदीला पुराच्या पाण्यामुळे पातळीत वाढ झाल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील माण खटाव व सांगोला तालुक्याला कृष्णा नदीच्या पुराचे ०.५ टीएमसी पाणी देण्यात आले असून आणखी १ टीएमसी पाणी देण्यात येणार असल्याचे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी सांगितले.
टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारित टप्प्यात सातारा जिल्ह्यातील माण खटाव व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला लाभक्षेत्रात उपसा सिंचन योजना कामाच्या प्रगतीबाबत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती. या बैठकीत माण खटाव व सांगोला मतदारसंघातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत खा. धैर्यशील मोहिते पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सांगोला तालुक्यातील माण नदीत पाणी सोडण्यात यावे तर टेंभू योजनेच्या आटपाडी डाव्या कालवामार्फत निंबवडे तलावाखालील बंदिस्त वितरिकेद्वारे लोटेवाडी खवासपूर व माण नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती.
या मागणीवर टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन ओगलेवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी कृष्णा नदीला पुराच्या पाण्यामुळे पातळी वाढलेली असल्याने योजना कार्यान्वित करुन टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील माण खटाव व सांगोला तालुक्यात पाणी सोडण्यात आले.
तसेच जलसंपदा विभागाच्या वतीने साधारणपणे १ टीएमसी पुराचे पाणी दुष्काळी भागातील कमी पर्जन्यमान असलेल्या लाभक्षेत्रात पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ०.५ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला असून आणखी १ टीएमसी पुराचे पाणी देण्यात येणार असल्याचे सांगितले.
समाविष्ट नसलेल्या गावांचे फेरसर्वेक्षण
सर्वेक्षणामध्ये समाविष्ट नसलेली गावांचे फेरसर्वेक्षण करण्यात येऊन नियोजनात समाविष्ट करण्याबाबत मागणी केली. मागणीच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता गुणाले, उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्र. १ सांगलीचे हरुगडे, लघु पाटबंधारे विभाग सांगली रासनकर यांनी सर्वेक्षण व पडताळणी करून समाविष्ट नसलेल्या गावांबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.